
नवी दिल्ली | New Delhi
भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) जी-२० शिखर परिषदेसाठी (G-20 Summit) सपत्नीक भारतात आले आहेत. भारतात आल्यानंतर त्यांनी आज दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला (Akshardham Temple) भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अक्षता मूर्तीही (Akshata Murti) उपस्थित होत्या. येथे त्यांनी स्वामी नारायणाचे (Swami Narayan) दर्शन घेतले. यावेळी मंदिराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ऋषी सुनक आज सकाळी पाऊस सुरू असताना पत्नी अक्षता मूर्तीसोबत अक्षरधाम मंदिरात पोहोचले. येथे त्यांनी सर्व विधींसह भगवान स्वामी नारायणाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे आध्यात्मिक नेते महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते त्यांनी पूजा केली. यावेळी ब्रिटीश पंतप्रधानांना स्वामीनारायण अक्षरधामचे विहंगावलोकन दाखवण्यात आले. अक्षरधाम मंदिर १०० एकर जागेवर पसरले असून हे मंदिर अध्यात्मिक आणि सांस्कृतिक संकुल असून भारताच्या परंपरा आणि प्राचीन वास्तूचा नमुना आहे.
मुख्य मंदिरात सुनक आणि त्यांच्या पत्नीने पवित्र प्रतिमांना आदरांजली वाहिली. तसंच, त्यांनी कला आणि वास्तुकलेची प्रशंसा केली. या जोडप्याने नीळकंठ वर्णी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक देखील केला आणि जागतिक शांतता, प्रगती आणि सौहार्द यासाठी प्रार्थना केली.
यावेळी ऋषी सुनक म्हणाले की, “आम्ही या मंदिराच्या सौंदर्य, शांतता, सौहार्दाने आनंदित झालो आहोत. हे केवळ प्रार्थनास्थळच नाही, तर भारताची मूल्ये, संस्कृती आणि जगासमोरील योगदानाचेही चित्रण करणारी एक महत्त्वाची खूण आहे. ब्रिटनमध्ये ब्रिटिश भारतीय समुदायाने आपल्या देशासाठी केलेल्या सकारात्मक योगदानातून हीच मूल्ये आणि संस्कृती आपण आज ब्रिटनमध्ये पाहतो.”
दरम्यान, राजधानी दिल्ली येथे शनिवारपासून सुरू झालेल्या जी-२० परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक शुक्रवारी भारतात दाखल झाले. पत्नी अक्षता मूर्तीसह ऋषी सुनक यांचे पालम विमानतळावर केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे व भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी स्वागत केले.
येथील विमानतळावर ऋषी सुनक यांच्या स्वागतासाठी आयोजित पारंपरिक नृत्याला ब्रिटनच्या पाहुण्यांनी दाद दिली. तर, चौबे यांनी जय सियाराम म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सुनक यांनी मी हिंदू असल्याचा आणि भारतीय वंशाचा असल्याचा मला अभिमान असल्याचेही म्हटले होते.
या जोडप्याने मंदिरात सुमारे एक तास घालवला, अशी माहिती सूत्रांनी दिली. या भेटीबद्दल बोलताना अक्षरधाम मंदिराचे संचालक ज्योतिंद्र दवे म्हणाले की, सुनक मंदिरात अनवाणी आले. त्यांना भेटल्यानंतर आम्हाला ते सनातनच्या अगदी जवळ असल्यासारखे वाटले.”