#RippedJeansTwitter ट्विटरवर ट्रेंड

जाणून घ्या काय आहे कारण...
#RippedJeansTwitter ट्विटरवर ट्रेंड

मुंबई | Mumbai

सध्या ट्विटरवर #RippedJeansTwitter हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. याच कारण ठरले आहे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचं वक्तव्य...

दरम्यान, मुख्यमंत्री तीरथ सिंह यांनी एका कार्यक्रमामध्ये महिला वापरत असलेल्या जीन्सवर वक्तव्य केले होते. “आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत,” असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटले होत. रावत यांनी महिलांच्या कपड्यांवरून केलेल्या टिप्पणीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर याबद्दल अनेकांनी वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत.

अल्पावधीतच नेटकर्‍यांनी देखील #RippedJeans सह रिप्ड जिन्स मधील फोटो पोस्ट करण्यास सुरूवात केली आहे. सोबतच महिलांच्या कपड्यांवरून त्यांच्यावर कमेंट्स पास करणार्‍या पुरूषी अहंकारी वृत्तीवर पुन्हा बोट ठेवण्यात आले आहे. अनेकींनी फोटो शेअर करत मुली घालत असलेल्या कपड्यांचा आणि त्यांच्यावरील संस्कारांचा थेट संबंध जोडणं बंद करण्याचेही सांगण्यात आले आहे.

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी देखील या ट्रेंडमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांनी देखील त्यांचा एक फोटो पोस्ट करत तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी विचार बदला मग देश बदलेल असा सल्ला मुख्यमंत्री रावत यांना दिला आहे.

त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार महुआ मोइत्रा यांनीही उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हंटल आहे की, 'उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणतात, जब नीचे देखा तो गमबूट था... और उपर देखा तो... एनजीओ चलाती हो आणि घुटने फटे दिखते है? मुख्यमंत्री साहेब - जबा आपको देखा तो ऊपर-नीचे-आगे-पीछे हमे सिर्फ बेशर्म - बेहुदा आदमी दिखता है' अशी जळजळीत प्रतिक्रिया महुआ मोईत्रा यांनी व्यक्त केली आहे. सोबतच 'राज्य चलाते हो और दिमाग फटे दिखते है' असं म्हणत 'जीन्स नाही बुद्धी फाटलेली आहे', अशी टीका मोइत्रा यांनी मुख्यमंत्री रावत यांच्यावर केली.

तसेच अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने देखील रावत यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आपली मानसिकता बदलण्याविषयी तिने मुख्यमंत्र्यांना म्हंटले. इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना नव्याने लिहिले, ' 'आमचे कपडे बदलण्यापूर्वी तुमची मानसिकता बदला. हैराण करणारी गोष्ट म्हणजे समाजात संदेश कसा दिला जात आहे. नव्याचा राग इतका वाढला की, तिने पोस्टनंतर फाटलेल्या जीन्समध्ये तिचा एक फोटोही शेअर केला होता. तो फोटो शेअर करताना नव्याने लिहिले की - मी माझी फाटलेली जीन्स घालेन, मी मोठ्या अभिमानाने घालेन … धन्यवाद.'

काय म्हणाले होते तीरथ सिंह रावत?

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी याच दरम्यान बोलताना “आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत,” हे वक्तव्य केले आहे. तसेच मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडील जबाबदार असतात, असे देखील ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री रावत यांनी यावेळी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला. मी एकदा विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितले की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेने फाटलेली जीन्स घातलेली होती. त्या महिलेला मी विचारले की कुठे जायचे आहे? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला जेएनयूमध्ये महिलेचा पती प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. त्यावेळी माझ्या मनात असा विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. आम्ही जेव्हा शाळेत होतो, तेव्हा असे नसल्याचेही रावत यांनी म्हटले आहे. तसेच तरुणांमध्येही व्यसन वाढत चालले आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावे लागेल. तसेच रावत यांनी पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावे लागेल, असे देखील म्हटले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com