बीएस-4 वाहनांच्या नोंदणीला स्थगिती
देश-विदेश

बीएस-4 वाहनांच्या नोंदणीला स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली |New Delhi -

बीएस-4 श्रेणीतील नवीन वाहनांची BS4 vehicles नोंदणी स्थगित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court मार्च महिन्यात टाळेबंदीनंतर बीएस-4 वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या विक्रीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. टाळेबंदीच्या काळात बीएस-4 श्रेणीतील वाहनांच्या विक्रीत प्रचंड वाढ झाल्याचे निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवले. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑगस्ट रोजी होणार आहे.

यापूर्वी न्यायालयाने बीएस-4 श्रेणीतील वाहनांची विक्री 31 मार्चपासून बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, 24 मार्च रोजी देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आल्यानंतर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनने बीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी मुदत वाढवून देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. त्यानुसार 24 मार्चपासून सुरू झालेली टाळेबंदी संपल्यानंतर पुढील 10 दिवसांत बीएस-4 श्रेणीतील उर्वरित वाहने विकण्यास सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिली होती. तसेच या वाहनांची नोंदणी करण्याचा कालावधीही वाढवण्यात आला होता.

मात्र, या अतिरिक्त कालावधीत या श्रेणीतील वाहनांची नेहमीपेक्षा जास्त विक्री झाली. त्यामुळे आता न्यायालयाने या नव्या वाहनांच्या नोंदणीवर सरसकट बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नवीन वाहन खरेदी केलेल्या बीएस-4 श्रेणीतील वाहनधारकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com