दिल्ली । Delhi

करोना महामारीचे जगभरात थैमान सुरू असताना संपूर्ण जगाचे लक्ष आता कोरोना प्रतिबंधक लसींकडे लागून राहिले आहे. काही कोरोना प्रतिबंधक लसींची चाचणी पूर्ण झाली आहे, तर काही लसी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. तर,

काही लसींचा वापर देखील सुरू करण्यात आला आहे. ब्रिटन, अमेरिका आणि रशियात लसीकरण सुरूवात झाली आहे. लसीकरणात लस उत्पादनांबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात असतानाच भारतासाठी चांगली बातमी समोर आली आहे. कारण आता भारतात रशियाच्या 'स्पुटनिक व्ही' या लसीचे उत्पादन होणार आहे.

रशियन डॉयरेक्ट इन्वेस्टमेंट फंडचे प्रमुख किरील दिमत्रेव यांनी याबाबत माहिती दिली. “भारतात स्पुटनिक व्ही लसीचे 2021 सालात जवळपास 30 कोटी लसींचे उत्पादन करण्यात येईल. यासाठी भारतातील चार प्रमुख लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांसोबत बोलणं झालं आहे”, असं किरील यांनी सांगितलं.

रशियाची करोना लस स्पुटनिक व्ही ही करोनावर 91.5 टक्के प्रभावी असल्याचा दावा लस निर्मिती कंपनीने केला आहे. लसीच्या चाचणीच्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर लस 91.5 टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. पहिल्यांदा केलेल्या चाचणीत लस 92 टक्के प्रभावी दिसली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत लस 91.4 टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं

गामलेया रिसर्च सेंटर फॉर अॅपिडायमोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या कंपनीने स्पुटनिक व्ही या कोरोना लसीची निर्मिती केली आहे. ही लस कोरोनाबाधित रुग्णांना शंभर टक्के बरे करणार, असा दावा कंपनीने केला आहे. या लसीच्या चाचणीचा संपूर्ण अहवाल लवकरच एका प्रतिष्ठित सायन्स जनरलमध्ये प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

रशियाची करोना लस ही सर्वसामान्य सर्दी, तापाला कारण असाणाऱ्या Adenovirus वर आधारित आहे. या लसीला कृत्रिमरित्या तयार करण्यात आलं आहे. ही लस करोना विषाणूमधील स्ट्रक्चरल प्रोटीनची नक्कल करते. याचा अर्थ असा की, ही लस टोलच्यानंतर मानवी शरीर त्याचप्रकारे प्रतिक्रिया देते ज्याप्रकारे करोना विषाणूला प्रतिक्रिया देते. मात्र, करोनासारखा जीवघेणा त्रास होत नाही. या लसीचे मॉस्कोच्या सेशेनॉ युनिव्हर्सिटीमध्ये 18 जून रोजी चाचणी सुरु झाली होती. एकूण 38 स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी करण्यात आली. या चाचणीत ही लस सुरक्षित असल्याची माहिती समोर आली.

भारतामध्ये अद्याप कोणत्याही लसीला तातडीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आली नसली तरीही 3 जणांनी DCGI कडे अर्ज केला आहे. येत्या काही आठवड्यात लसीकरणाला मंजुरी मिळू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केंद्र सरकारनेही लसीकरणाच्या गाईडलाईंस जारी केल्या आहेत.