सोन्यावर मिळणार 90 टक्के कर्ज

आरबीआयची घोषणा
सोन्यावर मिळणार 90 टक्के कर्ज

नवी दिल्ली | New Delhi -

करोना संकटामुळे प्रत्येकाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आर्थिक अडचणीमुळे सामान्य नागरिकांकडून गोल्ड लोनचा पर्याय अवलंबला जात आहे. त्यामुळे गोल्ड लोन घेणार्‍या ग्राहकांसाठी आरबीआयने मोठा दिलासा आहे. यापुढे सोन्यावर 90 टक्के कर्ज मिळणार आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. Reserve Bank of India (RBI) governor Shaktikanta Das

गुरुवारी शक्तीकांत दास यांनी पतधोरण जाहीर केलं. या नव्या पतधोरणात व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर, बँकेने रेपो रेट आणि रिझर्व्ह रेपो रेट आहे तसाच ठेवला आहे. सध्या रेपो रेट 4 टक्के आणि रिझर्व्ह रेपो रेट 3.3 टक्के इतका आहे. या पत धोरणात बँकेने लोन मोरेटोरिम बाबत दिलासा दिला नाही. पण बँकेने सर्व सामान्यांना एक मोठे गिफ्ट दिले आहे.

पण या पतधोरणात त्यांनी कर्जाची व्हॅल्यू वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सोन्यावर 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळणार आहे. आतापर्यंत सोन्याच्या एकूण मुल्यावर 75 टक्केपर्यंत कर्ज मिळत होते. तुम्ही जेव्हा गोल्ड लोन साठी अर्ज करता तेव्हा त्या सोन्याची गुणवत्ता तपासली जाते. सोन्याच्या गुणवत्तेनुसार त्यावर मिळणार्‍या कर्जाची रक्कम ठरवली जाते. सध्या बाजारात सोन्यच्या 75 टक्केपर्यंत कर्ज दिले जाते. करोना संकटात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा होऊ शकतो. सर्व साधारण लोक आणि छोटे व्यापारी सोन्यावर आता अधिक कर्ज घेऊ शकतील.

गुरुवारी ऑगस्ट व सप्टेंबरसाठीचे पतधोरण रिझर्व्ह बँकेकडून जाहीर करण्यात आले. बँकेने व्याज दरात कोणताही बदल केला नसला तरी या वर्षात लॉकडाउनचा विचार करता दोन वेळा व्याज दरात 1.15 टक्के इतकी कपात केली होती.

व्याज दराबाबत घोषणा केल्यानंतर दास यांनी देशात आर्थिक सुधारणा सुरू झाल्याचे सांगितले. विदेशी चलन साठा वेगाने वाढत असल्याचेही ते म्हणाले. करोना व्हायरसमुळे जगभरातील अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जानेवारी ते जून या काळात अर्थव्यवस्थेची स्थिती प्रचंड खराब होती, असे दास म्हणाले.

आर्थिक वर्षातील दुसर्‍या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर या काळात महागाई दर वाढण्याची शक्यता आहे. पण ऑक्टोबर महिन्यात त्याच घट होऊ शकते. आर्थिक वर्ष 2021 मध्ये जीडीपी ग्रोथ नेगेटिव्ह होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

ईएमआयबाबत दास यांनी कोणतीच घोषणा केली नाही. त्यामुळे कर्जाच्या व्याज दरावर कोणतीही सवलत मिळणार नाही. लोन मोरेटोरिम बाबत दास यांनी पत्रकार परिषदेत काहीच सांगितले नाही. 31 ऑगस्टला लोन मोरेटोरियमचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे दास यांच्याकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली होती. अर्थात बँकांकडून लोन मोरेटोरियमला आणखी मुदत वाढ देऊ नये अशी मागणी केली जात होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com