दिल्ली | Delhi

माणसामधील विकृतीचं दर्शन घडवणारी घटना उत्तरप्रदेशमधून समोर आली आहे. एका डॉल्फिनची काठ्या आणि रॉडने बेदम मारहाण करत हत्या करण्यात आल्याचा संतापजनक आणि दुर्दैवी प्रकार घडला आहे. पोलिसांनी कारवाई करत याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

व्हिडीओमध्ये आरोपी किती क्रूरपणे डॉल्फिनवर हल्ला करत असल्याचं दिसत आहे. काही जणांनी डॉल्फिनला पकडलं असून एकजण काठी आणि रॉडने त्याच्यावर वार करत होता. यावेळी एक व्यक्ती “विनाकारण मारत आहात” असं बोलतानाही ऐकू येत आहे. मात्र यानंतरही आरोपी थांबत नाहीत. रक्तबंबाळ झालेल्या डॉल्फिनवर आरोपी अखेर कुऱ्हाडीने वार करत असल्याचं दिसत आहे. निर्दयीपणे झालेल्या या हल्ल्यात अखेर डॉल्फिनने आपला जीव गमावला.

वनअधिकाऱ्याने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, “कॅनलच्या बाजूला डॉल्फिनलाच मृतदेह दिसला. गावकऱ्यांना विचारलं असता त्यांच्यापैकी कोणीही मृत्यू कसा झाला हे सांगण्यास तयार नव्हतं. मृतदेहावर अनेक जखमांच्या खुणा आहेत”. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवत अटकेची कारवाई केली.

काही महिन्यांपूर्वी केरळ मध्ये एका गर्भार हत्तीणीची काहींनी हत्या केली होती. मलप्पुरममध्ये फटक्यांनी भरलेले अननस खाल्ल्याने हत्तीणीची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला होता. माणूसकीला काळीमा फासणार्या या घटनेने सारेच हादरले होते. अनेकांनी सोशल मीडीयात याबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता. जून 2020 मधील या घटनेमध्ये हत्तीणी सह तिच्या गर्भातील बाळाचादेखील मृत्यू झाला होता. या घटनेबाबत वन्यजीव संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अज्ञात लोकांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आले होते.