डॉक्टर्स 1 जूनला बाबा रामदेव यांच्याविरोधात देशभर साजरा करणार ‘काळा दिवस’

डॉक्टर्स 1 जूनला बाबा रामदेव यांच्याविरोधात देशभर साजरा करणार ‘काळा दिवस’

नवी दिल्ली - अ‍ॅलोपॅथीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन योगगुरु बाबा रामदेव अडचणीत आले आहेत.

अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीवरून बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये (आयएमए) गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) सरचिटणीस डॉ. जयेश लेले यांनी बाबा रामदेव यांच्याविरुद्ध तक्रारही दाखल केली आहे.

आता निवासी डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे, अ‍ॅलोपॅथीविषयी बाबा रामदेव यांनी केलेल्या विधानाविरोधात 1 जून रोजी देशव्यापी निषेध करण्यात येणार असून हा काळा दिवस म्हणून साजरा करणार आहे. तसेच, याबाबत बाबा रामदेव यांनी जाहीरपणे बिनशर्त माफी मागावी, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी योगगुरु बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी एक मूर्ख आणि बिनकामाचं विज्ञान असल्याचे म्हटले आहे. बाबा रामदेव यांनी 25 प्रश्‍नही अलोपॅथीला विचारले आहेत. रेमडेसिवीर, फॅबीफ्लू व अन्य औषधे घेऊनही कोविड रुग्णांचे मृत्यू अलोपॅथी रोखू शकली नाही, असे आरोप त्यांनी केले होते. बाबा रामदेव यांच्या अशा टीकेनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत बाबा रामदेव यांनी आपली अलोपॅथीवरची टिप्पण्णी मागे घ्यावी असे त्यांना सुनावले होते. पण, बाबा रामदेव यांनी डॉक्टरांवर पुन्हा टीका केली.

बाबा रामदेव यांच्याविरोधात 1 हजार कोटींचा मानहानीचा दावा

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उत्तराखंड राज्यातल्या शाखेने बाबा रामदेव यांच्याविरोधात अलोपॅथी व अलोपॅथी चिकित्सेवर अवमानकारक टीका केल्याप्रकरणी एक हजार कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. या संदर्भातील एक नोटीस इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांना पाठवली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे उत्तराखंड शाखेचे सचिव अजय खन्ना यांनी 6 पानांची एक नोटीस बाबा रामदेव यांना पाठवली असून त्यात अलोपॅथीच्या 2000 डॉक्टरांची प्रतिष्ठा व त्यांच्या प्रतिमेवर रामदेव बाबा यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्यांची योगगुरू बाबा रामदेव यांनी खिल्ली उडवली आहे. ज्यांना काही मान नाही, असे लोक एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करत आहेत, अशा शब्दांत बाबा रामदेव यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनवर टीका केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com