
नवी दिल्ली - नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकर्यांचे गेल्या 6 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारशी चर्चेच्या अनेक फेर्यांनंतरही यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.
कोरोना संकटामुळे शेतकरी आंदोलनावर परिणाम झालेला पाहायला मिळाला. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून, आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला चालना देण्यासाठी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून शेतकरी देशभरातील राजभवनांना घेराव घालणार असल्याचे राकेश टिकैत यांनी सांगितले आहे.
राकेश टिकैत यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून, शनिवार, 26 जून रोजी लोकशाही वाचावा, शेतकरी वाचवा दिवस साजरा केला जाणार आहे. तसेच मीडियाशी बोलताना टिकैत म्हणाले की, शेतकरी आंदोलनाला आता सात महिने होतील. यामुळे राष्ट्रपतींनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची गरज आहे. तसेच 26 जून रोजी शेतकरी देशभरातील सर्व राजभवनांना घेराव घालतील. जल, जंगल आणि जमीन वाचवायची असेल, तर चोरांविरोधात लढाई, संघर्ष करावा लागेल, असे टिकैत यांनी सांगितले.
गतवर्षीच्या 26 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रत्येक महिन्याच्या 26 तारखेला विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या नियमांमुळे आंदोलनस्थळी गर्दी कमी आहे. मात्र, आगामी काळात शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलनस्थळी जमतील, असे टिकैत यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी ठोस निर्णय, तोडगा निघत नाही, तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही, याचा पुनरुच्चार राकेश टिकैत यांनी केला आहे.