
दिल्ली | Delhi
सध्या देशभरात लग्नसराई सुरु असल्याचे पाहायला मिळतंय. त्यामुळे लग्न घरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पण जोधपूरच्या (Jodhpur) शेरगडमध्ये लग्न सोहळ्यादरम्यान (wedding ceremony) मोठी दुर्घटना घडली. लग्न सोहळ्यावेळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असून यात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर ६० पेक्षा जास्त लोक गंभीररित्या भाजले आहेत.
मिळालेल्या महितीनुसार शेरगडजवळील भुंगरा गावात एका घरी विवाह सोहळा होता. मिरवणूक घरातून निघणार होती, तेवढ्यात अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडर गळती होऊन ही आग लागली. ज्या ठिकाणी ही घटना घडली, तेथे मोठ्या संख्येने वराती होते. यावेळी तब्बल पाठोपाठ पाच सिलेंडरचा स्फोट झाला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता रुग्णालयात पोहोचले. डॉ. एसएन मेडिकल कॉलेजचे प्राचार्य दिलीप कछावा यांनी सांगितले की, ६० जखमींपैकी ५१ जणांना जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ८ जण ९० टक्क्यांहून अधिक भाजले आहेत.