
नवी दिल्ली | New Delhi
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. आज (सोमवारी) लोकसभा सचिवालयाकडून सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर राहुल गांधींच्या खासदारकीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली...
राहुल गांधींनी कर्नाटकच्या कोलारमध्ये २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान १३ एप्रिल रोजी "सर्व चोरांचे आडनाव मोदीच कसं असतं?" असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला पूर्णेश मोदींनी राहुल गांधींविरोधात याचिका दाखल केल्यानंतर त्यावर २३ मार्च रोजी सूरत सत्र न्यायालयाने निर्णय दिला.
यानुसार, राहुल गांधींना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावर राहुल गांधींनी तातडीने अर्ज करून जामीन मंजूर करून घेतला खरा, पण त्यांना खासदारकी वाचवता आली नाही. यानंतर २३ मार्च रोजी सूरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी मानून शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधीची खासदारकी रद्द केली होती. कोणत्याही सदस्याला २ वर्षाची शिक्षा ठोठावली गेल्यास, त्याची खासदारकी रद्द केली जावी या नियमाचा आधार घेत ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली.
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीवेळी राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. यानंतर तीन दिवसातच लोकसभा सचिवालयाकडून त्यांना सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. यावेळी खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधींनी तब्बल १३६ दिवसांनंतर संसदेत दिमाखदार रुबाबात हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी काँग्रेसच्या नेत्यांसह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. तसेच राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. तब्बल चार महिन्यानंतर राहुल गांधी संसदेत दाखल झाल्याने कॉंग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांकडून एकच जल्लोष करण्यात आला.