
मुंबई | Mumbai
चेन्नईतील मद्रास इंटरनॅशनल सर्किट येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय कार रेसिंग चॅम्पियनशिपदरम्यान एक भीषण अपघात झाला. या अपघातात प्रसिद्ध रेसर केई कुमार यांचा मृत्यू झाला. केई कुमार हे ५९ वर्षांचे होते. केई कुमार हे मद्रास मोटर्स स्पोर्ट्स क्लब (MMSC) चे आजीवन सदस्य होते.
शर्यतीदरम्यान कुमार यांची कार दुसऱ्या स्पर्धकाच्या कारला धडकल्याने रविवारी सकाळी हा अपघात झाला. या धडकेमुळे कुमार यांची कार ट्रॅकवरून घसरली आणि अपघात घडला. त्यानंतर लाल झेंडा दाखवून शर्यत तात्काळ थांबवण्यात आली. यानंतर काही मिनिटांत केई कुमार यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले.
त्यानंतर वैद्यकीय केंद्रात प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचं प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आलं नाही. केई कुमार यांच्या निधनाबद्दल शर्यतीच्या आयोजकांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.