करोना लस घेतल्यानंतर रक्तस्राव आणि रक्ताच्या गाठी होण्याची समस्या

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली महत्वाची सूचना आणि माहिती
करोना लस घेतल्यानंतर रक्तस्राव आणि रक्ताच्या गाठी होण्याची समस्या

नवी दिल्ली - करोनाला रोखण्यासाठी सरकारकडून करोना प्रतिबंधक लसीकरणावर भर दिला जात आहे. अशावेळी कोविशील्ड लस घेतल्यानंतर काहीजणांना रक्तस्राव आणि रक्ताच्या गाठी होण्याची समस्या दिसून येत आहे. सोमवारी (दि. 17 मे) लसीकरणानंतरच्या दुष्परिणामाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने याबाबत माहिती दिली आहे.

त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, एक महत्वाची सूचना आणि माहिती दिली आहे. आरोग्य कर्मचारी आणि करोना प्रतिबंधक लस घेणार्‍या अन्य लोकांना थ्रोम्बोएम्बोलिक सिम्पटम्स बाबत जागरुक करा, अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने केली आहे. करोना लस घेतलेल्या लोकांमध्ये ही लक्षणं दिसून येत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या यादीतील लक्षणं ही रक्त गोठण्याच्या समस्येसंदर्भात आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोविशील्ड लस घेतलेल्या लोकांमध्ये थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स दिसून येत आहेत. त्यामुळे लसीकरणानंतर कोणतीही आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्यापूर्वीच त्याबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स हे लस घेतल्यानंतर साधारणपणे 20 दिवसांच्या आत दिसून येतात. या लक्षणांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण केल्यास त्यांना याबाबत माहिती मिळेल आणि ते काळजी घेतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

समितीने दिलेल्या अहवालानूसार, भारतात 3 एप्रिलपर्यंत 7 कोटी 54 लाख 35 हजार 381 लोकांना लस दिली होती, ज्यामध्ये 6 कोटी 86 लाख 50 हजार 819 जणांना कोविशिल्ड आणि 67 लाख 84 हजार 562 जणांना कोव्हॅक्सिन देण्यात आली होती. यादरम्यानच ब्रिटनमध्ये लस घेतल्यानंतर रक्तस्राव आणि रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. तेव्हा भारतात लसीकरणानंतरच्या दुष्परिणामाचा अभ्यासासाठी स्थापन केलेल्या समितीने याबाबत तपास सुरू केला होता. यादरम्यान 6 कोटी 59 लाख 44 हजार 106 जणांनी पहिला आणि 94 लाख 91 हजार 275 जणांनी दुसरा लसीचा डोस घेतला होता. तपासादरम्यान यामधील 23 लोकांनी लस घेतल्यानंतर दुष्परिणाम होत असल्याची तक्रार दिली होती. सर्व तक्रारी कोविन वेबसाईटच्या माध्यमातून 753 जिल्ह्यांपैकी 684 जिल्ह्यांमध्ये नोंदवल्या गेल्या होत्या.

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, ब्रिटनमध्ये 10 लाख लोकांपैकी 4 जणांमध्ये लोकांमध्ये रक्तस्राव आणि रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे समोर आले होते. जर्मनीमध्ये 10 लाख लोकांपैकी 10 लोकांमध्ये अशा प्रकारे दुष्परिणाम आढळले. भारतात हा आकडा 0.61 इतका आहे. आतापर्यंत देशात 16.42 कोटींहून अधिक कोविशिल्ड लसीचे डोस दिले गेले आहेत. त्यामुळे भारत सरकार सातत्याने या प्रकरणांवर नजर ठेवून आहे.

ब्लीडिंग आणि क्लोटिंगच्या तक्रारी

करोनाची लस घेतल्यानंतर ब्लीडिंग (रक्त वाहणे) आणि क्लोटिंग (रक्ताच्या गाठी) होणं ही समस्या भारतात कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. मात्र, लसीकरणाची गती वाढल्यास थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्सचे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताच्या काही भागात कोविशील्ड लस घेतल्यानंतर थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स दिसून येत आहेत. अशाच काही घटना 11 मार्च 2021 रोजी पाहायला मिळाल्या होत्या. अशा समस्या समोर आल्यानंतर सरकारकडून त्याबाबत पडताळणी करण्यात आली आणि त्याचा एक अहवाल तयार करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे हा विस्तृत अहवाल सादर करण्यात आला आहे.

समितीकडून अहवाल सादर

क्लोटिंग आणि ब्लीडिंगबाबत समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात 498 गंभीर प्रकरणांवर अभ्यास करण्यात आला आहे. त्यातील 26 प्रकरणे थ्रोम्बोएंबोलिकशी संबंधित असल्याचे समोर आले. यामध्ये तुमच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात. तसंच या गाठी फुटून अन्य धमन्यांना नुकसान होण्याची शक्यता असते. असे प्रकार कोविशील्ड लस घेतलेल्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आले आहेत. असं असलं तरी त्याचा दर प्रति 10 लाख डोसमध्ये 0.61 टक्के आहे. दरम्यान, कोव्हॅक्सीन लसीबाबतही अशी लक्षणं आढळून आली आहेत. पण ती गंभीर नसल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

भारतात प्रमाण कमी

थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्सच्या तक्रारी ब्रिटन आणि जर्मनीमध्ये जास्त प्रमाणात समोर आल्या आहेत. थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स कोणत्याही देशातील कोणत्याही व्यक्तीमध्ये पाहिला जाऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते युरोपीय देशांच्या तुलनेत दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये या समस्या कमी आहेत. भारतात या समस्या आढळून आल्या आहेत, मात्र लक्षणं गंभीर नाहीत.

थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्समध्ये आढळणारी बारा लक्षणे

श्‍वास घेण्यास त्रास होणे

छातीत दुखणे

हात दुखणे

इंजेक्शन केलेल्या जागेच्या बाजूला त्वचेवर लाल डाग उठणे

उलटी होणं आणि पोटात दुखणे किंवा फक्त पोटात दुखणे

शरिरावर रेषा उमटणे

उलटी आणि डोके दुखणे किंवा फक्त डोके दुखी

अशक्तपणा, हात किंवा शरीराच्या अन्य भागाला पॅरालिसिस (चेहर्‍यावरही)

विनाकारण उलटी होणे

नजरेसमोर अंधारी येणे, डोळे दुखणे किंवा वस्तू दोन-दोन दिसणे

मानसिक स्थितीत बदल, कन्फ्युजन किंवा डिप्रेशन

अशी शारीरिक स्थिती जी चिंता वाढवेल

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com