चार सरकारी बँकांचे खासगीकरण
देश-विदेश

चार सरकारी बँकांचे खासगीकरण

केंद्र सरकार विकणार हिस्सा

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली |New Delhi -

केंद्र सरकार चार सरकारी बँकांचे खासगीकरण करणार आहे. त्यानुसार येत्या मार्चपर्यंत सरकार या बँकांमधील आपला हिस्सा खासगी गुंतवणूकदारांना विकून त्यातून निधी गोळा करणार आहे. privatisation of banks

पंतप्रधान कार्यालयातील अधिकार्‍यांनी तसे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब आणि सिंध बँक, आयडीबीआय आणि युको बँक या चार सरकारी बँकांचे खासगीकरण होण्याची शक्यता आहे.


करोनाच्या लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे आणि व्यावसायिक अस्थापणे बंद असल्याने आणि ती आजही पूर्ण क्षमतेने सुरू झाली नसल्यामुळे सरकारच्या महसूली उत्पन्नात मोठी घट झाली आहे. ती काहीअंशी भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने या चार बँकांमधील आपली हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या चार बँका खासगी गुंतवणूकदारांच्या हातात जाणार आहेत. मात्र सरकार नेमका किती हिस्सा विकणार आहे. हे समजू शकले नाही.

पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक आणि आयडीबीआय या सरकारी बँकांसह अनेक सरकारी बँका थकीत कर्जाची वसुली करण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे सरकार या बँकांचे खासगीकरण करणार असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र निधी गोळा करण्यासाठी सरकार बँकांमधील आपला हिस्सा विकणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने त्याबाबतचे पत्र वित्त मंत्रालयाला पाठवले आहे. या वित्त वर्षात चारही बँकांची खासगीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यास त्यांनी सांगितले आहे. असे असले तरी केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. काही सरकारी समित्या आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशात केवळ 5 सरकारी बँका ठेवाव्यात असा सल्ला सरकारला दिला आहे. त्यामुळे सरकारने या बँकांच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्यावर्षी सरकारने 10 बँकांचे विलिनीकरण केले. त्यामुळे सध्या देशात 12 सरकारी बँका आहेत. 1017 पर्यंत देशात 27 सरकारी बँका होत्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com