करोना : पंतप्रधानांची दहा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक ; उद्धव ठाकरे म्हणाले...

करोना : पंतप्रधानांची दहा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक ; उद्धव ठाकरे म्हणाले...
ANI

नवी दिल्ली -

करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. आज सकाळी करोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदींनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत देशातील स्थितीवर चर्चा केली. त्यानंतर मोदींनी 10 राज्यांतील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती.

या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीनंतर ऑक्सिजन निर्मात्यांसोबत पंतप्रधान मोदींची बैठक आयोजित केली आहे.

करोना विरुद्धची लढाई जिंकू - मुख्यमंत्री ठाकरे

करोना विरुद्धची लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांनी कोविड संसर्ग रोखण्यावर लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे मात्र आम्ही अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील काळजी घेत आहोत. ही लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकू असा आत्मविश्‍वास व्यक्त केला. राज्यात मोठ्या प्रमाणावर निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका यांची देखील मदत घेण्यात येत असून रुग्णांस तात्काळ योग्य ते उपचार सुरु व्हावेत म्हणून टेलीमेडिसिन व टेली आयसीयूवर भर देण्यात येत आहे.

लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे देऊन उपचार करण्यात येत आहेत तसेच निवृत्त डॉक्टर्सच्या जोडीने वैद्यकीय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे.

रेमडेसिवीर, लस पुरवठा वाढवावा

महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठा ही आवश्यक आहे. ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लँट्सच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने राज्याला मिळावा अशी मागणी करून मुख्यमंत्री म्हणाले की ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने त्यांना संसर्ग थोपवता आलेला आहे. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता त्यामुळेच इतर देशांतून उत्पादन होत असलेल्या लसी आम्ही आयात करून लसीकरण अधिक गतीने वाढवू शकतो का यावर मार्गदर्शन करावे. रेमडीसीव्हीर किती उपयुक्त आहे ते सांगता येत नाही पण रुग्णांचा रुग्णालयांतील कालावधी निश्‍चितपणे कमी करत आहे त्यादृष्टीने राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा असेही ते म्हणाले. रेमडेसिवीर व्यतिरिक्त इतर आवश्यक औषधांचा देखील तुटवडा भासू शकतो, हे लक्षात घेऊन केंद्राने तो पुरवठाही नियमित करावा असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

विषाणूच्या दुहेरी उत्परिवर्तनाचा अभ्यास आवश्यक

राज्यात विषाणूचे दुहेरी उत्परिवर्तन आढळल्याने संसर्गातही झपाट्याने वाढ झाली यासंदर्भात पुढील वाटचालीसाठी याबात योग्य तो अभ्यास व्हावा तसेच जिनोम सिक्वेन्सिंग करावे जेणे करून योग्य ते धोरण ठरवता येईल असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com