दिल्ली । Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गुजरातच्या राजकोटमध्ये उभारल्या जाणाऱ्या एम्स रुग्णालयाचं भूमिपूजन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळी पंतप्रधानांनी संबोधित करताना म्हणाले की, "जगातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम राबवण्याच्या दृष्टीने भारतात तयारी सुरु आहे. लसीकरणाची तयारी सध्या शेवटच्या टप्प्यात असून लोकांना भारतात निर्मिती झालेल्या लसीचा डोस मिळेल, असं यावेळी मोदींनी म्हटलं आहे.

“देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या सध्या कमी होत चालली आहे. आम्ही जगातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम राबवण्याची तयारी करत आहोत,” असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. “२०२० ने आपल्याला आरोग्य हीच संपत्ती आहे हे चांगलंच शिकवलं आहे. हे वर्ष अनेक आव्हानं घेऊन आलं,” असंही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “भारत जागतिक आरोग्याचे मुख्य केंद्र म्हणून उदयास आलं आहे. २०२१ मध्ये आपल्याला आरोग्य सेवेसाठी भारताची भूमिका बळकट करावी लागेल”. नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवरही निशाणा साधला. “२०१४ मध्ये आपलं आरोग्य क्षेत्र वेगळ्याच दिशेला होतं. वेगवेगळ्या दृष्टीकोनातून काम केलं जात होतं. प्राथमिक आरोग्य केंद्राचाही वेगळीच प्रणाली होती. गावात योग्य सुविधा मिळत नव्हत्या,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. “भारताने योग्य वेळेत पाऊलं उचलल्याने आज आपण चांगल्या स्थितीत आहोत. १३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात एक कोटी लोकांनी करोनाविरोधातील लढाई जिंकली आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

एकजुटीनं भारतानं वेळीच प्रभावी पाऊलं उचलली, त्याचीच परिणीती म्हणून आपण आज चांगल्या स्थितीत आहोत. ज्या लोकांमध्ये १३० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या आहे अशा देशात जवळजवळ १ कोटी लोकांनी या आजाराशी लढा देऊन विजय मिळविला आहे. २०२० या वर्षात निराशा होती, चिंता होती, अनेक प्रश्न समोर उभे होते. परंतु २०२१ उपचारांची, लशीची आशा घेऊन आलंय. लस संदर्भात सर्व आवश्यक तयारी भारतभर सुरू आहे, असंही पंतप्रधान मोदींनी सांगितलं. वर्षाच्या अखेरच्या दिवशी भारतातील लाखो डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, औषध दुकानांत काम करणारे आणि इतर फ्रंटलाईन करोना योद्ध्यांचं कौतुकही पंतप्रधान मोदींनी या निमित्तानं केलं.