
नवी दिल्ली (New Delhi)
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तात १ जुलै २०२२ पासून ४ टक्क्यांऐवजी ५ टक्क्यांपर्यंत वाढ मिळेल अशी शक्यता आहे.
महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ होईल, असा अंदाज या आधी वर्तवण्यात येत होता. आता औद्योगिक कामगारांसाठीच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाची ताजी आकडेवारी समोर आल्यानंतर अधिक वाढ मिळण्याचे संकेत आहेत.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता मिळतो. हा भत्ता ३८ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता होती. मात्र आता ही ५ टक्के होणार असल्याचे म्हटले जात आहे. देशातील वाढती महागाई पाहता, जुलै महिन्यात केंद्र सरकार महागाई भत्ता वाढवण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ वरून ३९ टक्क्यांपर्यंत वाढल्यास केंद्रीय पगार ८ हजार रुपयांवरून २७ हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांवर होणार आहे. महागाईबरोबरच ईएमआयही महाग होत आहे, अशा परिस्थितीत महागाई भत्त्यात वाढ केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.