दिल्ली | Delhi

नेपाळचे कार्यकारी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भूमिका नेपाळमधील राजकीय गोंधळादरम्यान दिवसोंदिवस मवाळ होताना दिसत आहे. भारत आणि नेपाळ चांगले मित्र असल्याचे ओली यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केपी शर्मा ओली बोलत होते.

चीनचे खंदे समर्थक मानल्या जाणाऱ्या ओली यांनी जिनपिंग सरकारला थेट शब्दांमध्ये इशारा दिला आहे. चीनने नेपाळच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ करु नये. भारत आणि नेपाळ हे चांगले मित्र आहेत, असं ओली यांनी म्हटलं आहे. नेपाळला स्वत:चं स्वातंत्र्य प्रिय असून आम्ही इतर देशांचे आदेश मानणार नाही, असंही ओली यांनी म्हटलं आहे. भारताचे कौतुक करताना कोणताही तिसरा देश आमच्या मध्ये येऊ शकत नाही असं म्हटलं आहे. भारत आणि नेपाळमधील मैत्री ही स्वाभाविक असून दोन्ही देशांच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही, असा विश्वासही ओली यांनी व्यक्त केला आहे.

दुसरीकडे, ओली यांचा हा राजकीय डाव असल्याचे सांगितले जात आहे. भारतासोबतचे संबंध पुन्हा सामान्य करत कोरोना लसीचा पुरवठा भारताकडून होईल, हे सुनिश्चित करण्याचा ओली यांचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कालापानी-लिंपियाधुरी-लिपुलेख हे प्रदेश नेपाळचा भाग असून, ते भारताकडून घेऊच, असा पवित्रा ओली यांनी घेतला होता. मुसद्दी मार्गाने भारताशी चर्चा करून हे तीनही भूभाग पुन्हा घेतले जातील. सन १९६२ मध्ये भारत-चीन युद्धानंतर भारतीय सैन्य या ठिकाणी तैनात करण्यात आले. मात्र, आता हे तीन भूभाग भारताकडून पुन्हा एकदा नेपाळमध्ये घेऊ, असे ओली यांनी म्हटले होते.