चीनची कोणतीही आगळीक खपवून घेणार नाही
देश विदेश

चीनची कोणतीही आगळीक खपवून घेणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’मध्ये चीनवर निशाणा

Dhananjay Shinde

सार्वमत

नवी दिल्ली - भारतीय जमिनीवर डोळा ठेवणार्‍यांना लडाखमध्ये तडाखेबंद प्रत्युत्तर देण्यात आले. देशाच्या स्वाभिमानाला धक्का लागणारी कोणतीही आगळीक खपवून घेतली जाणार नाही, असे या वीर जवानांनी दाखवून दिले. भारत मैत्रीभावनेचा सन्मान ठेवतो. मात्र, कोणत्याही दुःसाहसाला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमताही या देशात आहे. हे प्रत्युत्तर देताना मागेपुढे पाहिले जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे नाव न घेता म्हटले आहे. मन की बात कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी गलवान खोर्‍यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीसोबत झालेल्या संघर्षात हौतात्म्य पत्करणार्‍या 20 जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

कमकुवत असलेली व्यक्ती शिक्षणाचा वापर संघर्षाचा प्रसार करण्यासाठी वापरते, इतरांना त्रास देण्यासाठी संपत्ती आणि शक्ती मिळवतो, तर एक सद्गृहस्थ शिक्षणाचा वापर ज्ञान वाढवण्यासाठी, संपत्तीचा वापर मदतीसाठी आणि शक्तीचा वापर संरक्षणासाठी करतो, असा एक जुना दाखला त्यांनी यावेळी दिला. भारत शक्तीचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करतो, असेही त्यांनी सांगितले.स्थानिक पातळीवर तयार झालेल्या उत्पादनांचा वापर करण्यावर जोर देत ते म्हणाले की, लोकल फॉर व्होकल हे एक देश सशक्त करण्याचे आणि देशसेवेचे माध्यम आहे. आत्मनिर्भर होणे हे भारताचे लक्ष्य आहे. विश्वास आणि मैत्री ही भारताची परंपरा आहे आणि बंधुत्व हा देशाचा आत्मा आहे. या मूल्यांनीच आपला देश समोर जात राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आत्मनिर्भर भारत हीच शहीदांना श्रद्धांजली - गलवान खोर्‍यात शहीद झालेल्या जवानांना आत्मनिर्भर भारत हीच खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी आपण आपली क्षमता वाढवणे आवश्यक आहे. सत्य आणि गहन अर्थाने आत्मनिर्भर भारत शहीदांना श्रद्धांजली ठरेल असेही ते म्हणाले.पूर्व लडाखमध्ये झालेला संघर्ष पाहू जाता केवळ स्थानिक उत्पादने वापरण्याचा निर्धार केला, असे पत्र आसाममधील एका महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. या महिलेचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला. या अर्थाचा संदेश देशातील प्रत्येक कोपर्‍यातून प्राप्त होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

संरक्षण, तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडी घेण्याचा प्रयत्न -आज संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आघाडी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आपण मोठे पाऊल उचलले आहे असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

अर्थव्यवस्था सशक्त करण्यावर भर - देश आता लॉकडाऊनमधून बाहेर पडत अनलॉकमध्ये प्रवेश करीत असल्याने कोरोना विषाणूचा पराभव करण्यावर आणि अर्थव्यवस्थेला सशक्त करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. भारताने नेहमीच प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यश मिळवले आहे. त्यात यंदाचे वर्षही वेगळे नसेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com