पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा ठरला! बायडन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिलीच भेट

पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा ठरला! बायडन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिलीच भेट

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. अखेर या दौऱ्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पंतप्रधान मोदी 'क्वॉड' देशांच्या परिषदेत (Quad Leaders Summit) सहभागी होणार असून, पहिल्यांदाच दोन्ही देशांचे नेते समोरासमोर एकमेकांना भेटणार आहेत.

क्वॉड परिषद २४ सप्टेंबरला पार पडत आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन (US President Joe Biden), ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (PM Scott Morrison) आणि जापानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा (PM Yoshihide Suga) हे सहभागी होतील. अमेरिकेच्या 'व्हॉईट हाऊस'मध्ये (White House) बसून हे चारही नेते एकमेकांशी संवाद साधतील.

या बैठकीत नेते १२ मार्चला झालेल्या पहिल्या व्हर्च्यूअल परिषदेनंतर झालेली प्रगती तसेच सामायिक हिताचे प्रादेशिक मुद्दे यावर चर्चा करतील. करोना (COVID19) महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून यावेळी मार्च महिन्यात लसीसंबंधी करण्यात आलेल्या घोषणेसंबंधी यावेळी आढावा घेण्यात येईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. याशिवाय, भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Corona second Wave) मोठा फटका बसला होता. तसेच या बैठकीत तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, हवामान बदल, शिक्षण अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

अफगाणिस्तानमधून (Afganisthan) सैन्य माघारी घेतल्यानंतर जो बायडन सध्या टीकेला सामोरे जात असतानाच ही बैठक होणार आहे. दरम्यान अमेरिकेत सत्तापालट झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच दौरा ठरणार असून जो बायडन यांची भेट घेण्याचीही पहिलीच वेळ असेल.

दरम्यान क्वॉड ही चीनविरोधी राष्ट्रांची हातमिळवणी असल्याची टीका विरोधकांकडून बऱ्याचदा केली जाते. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी क्वॉडला 'एशियन नाटो' म्हणूनही संबोधलं होतं. 'नाटो' ही अमेरिकेच्या नेतृत्वाखाली युरोपीयन देशांचं तयार करण्यात आलेली सैन्य संघटना आहे. परंतु, विरोधकांचे आरोप भारतासहीत इतर सदस्य देशांकडून अनेकदा फेटाळण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com