नवे शैक्षणिक धोरण नवभारताचा पाया - पंतप्रधान
देश-विदेश

नवे शैक्षणिक धोरण नवभारताचा पाया - पंतप्रधान

मातृभाषेमुळे शिकण्याचा वेग वाढणार

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

आतापर्यंतचे शैक्षणिक धोरण कोणता विचार करायचा, यावर भर देणारे होते, पण नवे शैक्षणिक धोरण विचार कसा करायचा, हे शिकविणारे आहे. या धोरणात नवभारताचा पाया रचला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. PM Narendra Modi

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणा यावर आभासी पद्धतीने आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले,

वर्तमान आणि भविष्याचा विचार करूनच हे शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे, शैक्षणिक धोरणात मोठ्या प्रमाणात बदल कागदावर केला, पण प्रत्यक्षात कसा आणणार, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या धोरणाची अंमलबजावणी कशी केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे, तर मी पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. भारताला शक्तिशाली बनविण्यासाठी, विकासाची नवी उंची गाठण्यासाठी, नागरिकांना अजून सशक्त करण्यासाठी व जास्तीत जास्त संधी देण्यासाठी या धोरणात विशेष लक्ष देण्यात आले आहे. National Education Policy 2020

देशभरात नव्या शिक्षण धोरणावर चर्चा होत आहे. वेगवेगळ्या विचारांचे लोक मत मांडत आहेत. या धोरणावर मंथन करीत आहेत. यावर जितकी जास्त चर्चा होईल, तितका शिक्षण व्यवस्थेला फायदा होणार आहे. देशातील कोणत्याही क्षेत्र किंवावर्गाकडून यात एकतर्फी निर्णय असल्याची टीका झालेली नाही. अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या शिक्षण धोरणात बदल व्हावा, ही लोकांची अपेक्षा होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आपल्या युवकांमध्ये वेगळा विचार विकसित होण्यासाठी शिक्षणाचा हेतू बदलण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानाला सर्जनशीलतेची जोड देण्याचा आम्ही प्रयत्न केला. तीन ते चार वर्ष चर्चा केल्यानंतर तसेच लाखोंच्या संख्येत आलेले सल्ले व सूचना लक्षात घेऊन नवे धोरण तयार करण्यात आले, असेही पंतप्रधान म्हणाले.

मातृभाषेमुळे शिकण्याचा वेग वाढणार - घरात बोलली जाणारी भाषा आणि शाळेत शिकवली जाणारी भाषा एकच असल्याने मुलांचा शिकण्याचा वेग वाढतो, यात काही दुमत नाही. यामुळेच पाचवीपर्यंत मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिकविण्याची परवानगी दिली आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com