
नवी दिल्ली | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज दूरदृष्यप्रणालीद्वारे (०६ ऑगस्ट) रोजी देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासाच्या कामांची पायाभरणी केली. रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) देशातील १ हजार ३०० रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 'अमृत भारत स्टेशन' योजनेअंतर्गत टप्प्या-टप्प्याने देशातील रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे...
'अमृत भारत स्टेशन' योजनेसाठी (Amrut Bharat Station Scheme) तब्बल २४ हजार ४७० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या स्थानकांमध्ये प्रवाशांना (Passengers) अनेक सोयी सुविधा देण्यात येणार आहेत. या योजनेतून महाराष्ट्रातील (Maharashtra) ४४ रेल्वे स्थानकांचा (Railway Stations) विकास करण्यात येणार आहे. या योजनेचा उद्धेश शहराच्या दोन टोकांचे एकत्रीकरण करणे, स्टेशन इमारतींची सुधारणा आणि पुनर्विकास करणे, आधुनिक प्रवासी सुविधांची तरतूद करणे, उत्तम वाहतूक व्यवस्था आणि इंटरमॉडल इंटिग्रेशन करणे, एकसमान आणि सहाय्यक मार्गदर्शक चिन्ह लावणे, मास्टर प्लॅनमध्ये योग्य मालमत्ता विकासासाठी तरतूद करणे, लँडस्केपिंग, स्थानिक कला आणि संस्कृती लोकांपर्यत्न पोहोचवणे हा आहे.
यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'जगातील रेल्वेचे जाळे जितके दक्षिण आफ्रिका, युक्रेन, स्वीडन, यूके यांसारख्या देशांमध्ये आहे तितके एकट्या भारताने ९ वर्षात रेल्वे ट्रॅक बांधले आहेत. लोकांचा प्रवास हा सुलभ आणि आनंददायी व्हावा हे देशाचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर बसण्यासाठी उत्तम वेटिंग रूम बनवण्यात येणार असून हजारो स्थानकांवर मोफत इंटरनेट (Internet) उपलब्ध करून देण्यात येईल.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, विकासाच्या ध्येयाकडे वाटचाल करणारा भारत आपल्या अमृत कालावधीच्या सुरुवातीला आहे. आजपासून एक नवा अध्याय सुरू होत आहे. १३०० रेल्वे स्थानकांपैकी ५०८ अमृत भारत स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. यावर २५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. तसेच ३० वर्षांत पहिल्यांदाच देशात पूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे जगभरात भारताची विश्वासार्हता वाढली आहे. तर विरोधी पक्ष (Opposition Party) अजूनही जुन्याच पद्धतीवर ठाम असून स्वतः काही करणार नाही आणि दुसऱ्यालाही काही करू देणार नाही. संसदेच्या नवीन इमारतीला विरोधकांनी विरोध केला असेही मोदींनी म्हटले.
महाराष्ट्रातील या स्थानकांचा होणार कायापालट
गोधनी, काटोल, नरखेड, औरंगाबाद, किनवट, मुदखेड, अहमदनगर, कोपरगाव, बडनेरा, धामणगाव, परळी वैजनाथ, मलकापूर, शेगाव, बल्लारशाह, चांदा किल्ला, चंद्रपूर स्टेशन, गडचिरोलीचे वडसा (देसाईगंज), गोंदिया, हिंगोली, चाळीसगाव, परळी, कोल्हापूर SCSMT, लातूर स्टेशन, मनमाड, नगरसोल, उस्मानाबाद स्टेशन, गंगाखेड, परभणी जंक्शन, पूर्णा जंक्शन, सेलू, आकुर्डी, दौंड, तळेगाव जंक्शन, कुर्डूवाडी जंक्शन, पंढरपूर, सोलापूर जंक्शन, हिंगणघाट, पुलगाव जंक्शन, सेवाग्राम जंक्शन, सेवाग्राम जंक्शन, परळ, कांजूर मार्ग आणि विक्रोळी या स्थानकांचा कायापालट होणार आहे.
कोणत्या राज्यातील किती इस्टेशन्स ?
आंध्र प्रदेशातील १८, आसाममधील ३२, बिहारमधील ५०, छत्तीसगडमधील ७, नवी दिल्लीतील ३, झारखंडमधील २०, कर्नाटकातील १३, केरळमधील ५, मध्य प्रदेशमधील ३४, महाराष्ट्रातील ४४, मेघालयमधील १, नागालँडमधील १, ओडिशातील २५, पंजाबमधील २२, राजस्थानमधील ५५, तामिळनाडूतील १८, तेलंगणातील २१, त्रिपूरातील ३, जम्मू-काश्मीरमधील ५, पुडुचेरीमधील १, उत्तर प्रदेशातील ५५, उत्तराखंडमधील ३, पश्चिम बंगालमधील ३७ रेल्वे स्थानकांचा समावेश होणार आहे.