आज पंतप्रधानांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही राहणार उपस्थित

आज पंतप्रधानांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही राहणार उपस्थित

दिल्ली | Delhi

परदेश दौऱ्यावरून भारतात परतल्यानंतर लगेचच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दुपारी १२ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कमी लसीकरण (Covid Vaccine) झालेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत संबंधित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हेदेखील हजेरी लावतील.

करोना (Coronavirus) प्रतिबंधक लसीचा पहिला डोस ५०% पेक्षा कमी दिलेल्या आणि दुसऱ्या डोसची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यांचा या बैठकीत समावेश असेल. झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि अन्य राज्यातील कमी लसीकरण व्याप्ती असलेल्या ४८ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. यावेळी या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

देशात लसीकरणात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर उत्तर प्रदेश टॉपवर आहे. महाराष्ट्रातही लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. त्यासाठी डोसची मात्राही उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आहे.

राज्यातील ९ कोटी ८५ लाख नागरिकांनी करोना प्रतिबंधकात्मक लसींची डोस घेतले आहेत. ६ कोटी ७३ लाख ९० हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर ३ कोटी ११ लाख ४३ हजार नागरिकांनी दुसऱ्या डोसची मात्रा घेतल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com