'यास' चक्रीवादळाचे संकट; पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

'या' राज्यांना सतर्कतेच्या सूचना
'यास' चक्रीवादळाचे संकट; पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

दिल्ली | Delhi

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर नुकतंच 'तौते' चक्रीवादळ धडकल्यानंतर बसलेल्या धक्क्यातून बचावकार्य करणाऱ्या यंत्रणा सावरल्या नाहीत, तोच आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नवं 'यास' चक्रीवादळ घोंघावू लागलं आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक वेगाने वाढला, तर येत्या २६ मे रोजी 'यास' चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

यास चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता, प्रशासन सतर्क झालं आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्च स्तरीय बैठक घेतली आहे. चक्रीवादळाच्या धोक्याबाबत प्रशासनानं काय तयारी केली, याचा आढावा पंतप्रधान मोदींकडून घेण्यात आला आहे. या बैठकीत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, टेलिकॉम, उर्जा, सिव्हिल एव्हिएशन, अर्थ सायन्स या खात्यांचे सचिव उपस्थित होते. त्याचबरोबर या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते.

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार २६ मे रोजी यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल किंवा ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून पश्चिम बंगाल आणि ओडिशासोबतच आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबारमधील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील या राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून किनारी भागामध्ये आरोग्य व्यवस्था अधिक वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, यास चक्रीवादळाच्या मार्गात येणाऱ्या प्रदेशामध्ये असलेल्या रुग्णालयांमधील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत देण्याचं आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.

यासच्या पार्श्वभामीवर NDRF सज्ज झाली आहे. काही तुकड्या पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पाठवायला सुरुवात देखील करण्यात आली आहे. 'यास' चक्रीवादळाच्या प्रवासासंदर्भात हवामान विभागाकडून जसजशी माहिती दिली जाईल, त्याप्रमाणे NDRF च्या इतर तुकड्या त्या त्या ठिकाणी मदतकार्यासाठी पाठवल्या जातील. तसेच भारतीय नौदलाने बचाव कार्यासाठी कंबर कसली आहे. पूर्वी किनारपट्टीवर नौसेना मानवीय सहायता एवं आपदा राहत समूह (HADR) ने चार जहाजे आणि विमानांना तयार ठेवले आहे. यासह गोताखोर आणि मेडिकल टीमने पण तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.

गेल्या वर्षी देखील बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'अम्फान' या चक्रीवादळाचा पश्चिम बंगालला तडाखा बसला होता. यामध्ये कोलकाता, २४ उत्तर परगणा, दक्षिण परगणा या भागामध्ये या वादळाचा तडाखा बसला. तिथून पुढे हे वादळ बांग्लादेशच्या दिशेनं वळालं होतं.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com