
दिल्ली | Delhi
प्रोजेक्ट टायगरला आज ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल म्हैसूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाघांची अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे. आज देशातील वाघांच्या संख्येने ३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, नव्या आकडेवारीनुसार २०२२ च्या अखेरपर्यंत भारतात वाघांची संख्या ३ हजार १६७ झाली आहे. भारताने ५० वर्षापूर्वी १ एप्रिल १९७३ रोजी वाघ वाचवण्याची सर्वात मोठी मोहीम सुरू केली होती. प्रोजेक्ट टायगर असे त्याला नाव देण्यात आले. तेव्हापासून देशातील वाघांची संख्या सातत्याने वाढत असून आज जगातील ७० टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. दरवर्षी ही संख्या ६ टक्क्यांनी वाढत आहे.
तसेच, प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण होत असताना आम्ही एका महत्त्वाच्या काळाचे साक्षीदार आहोत. भारताने केवळ वाघांना वाचवले नाही तर त्यांना एक अशी परिसंस्थाही दिली ज्यातून त्यांची भरभराट होऊ शकते. जगाच्या एकूण भूभागापैकी केवळ २.४ टक्के क्षेत्रफळ आपल्याकडे आहे.
पण जागतिक विविधतेत आपला वाटा ८ टक्के आहे. अनेक दशकांपूर्वी भारतातून चित्ता नामशेष झाला होता. पण आम्ही दक्षिण आफ्रिका आणि नामिबियामधून चित्ता आणले आणि एका देशातून दुसऱ्या देशात चित्ता आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आपल्या देशात जगातील सर्वाधिक आशियाई हत्ती आहेत.