व्हेंटिलेटरर्सचे ऑडिट करा ; पंतप्रधानांचे आदेश

अनेक राज्यांतून तक्रारी
व्हेंटिलेटरर्सचे ऑडिट करा ; पंतप्रधानांचे आदेश

नवी दिल्ली - पीएम केअर्स फंडातून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरर्सबाबत अनेक राज्यांतून तक्रारी आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त करत ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.

यावेळी करोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच या बैठकीत लसीकरण, कन्टेन्मेंट झोन संबंधित रणनीती, करोना चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर, आरोग्य सेवांच्या संसाधनांवर लक्ष केंद्रीत करणे, ग्रामीण भागात ऑक्सिजन पुरवठा अशा विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मंत्रालयातील मंत्री आणि अधिकारी यांचा सहभाग होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राकडून राज्यांना देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरबाबतचे प्रश्‍न गंभीरतेने घेतले.

केंद्राकडून देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स काही राज्यांत धूळ खात पडून असल्याचे निदर्शनास आले होते. या व्हेंटिलेटरचा उपयोग केला जात नसल्याने पंतप्रधान मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरचं ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी दिले. गरज पडल्यास आरोग्य कर्मचार्‍यांना व्हेंटिलेटर वापरण्याचं प्रशिक्षण देण्यात यावे असेही त्यांनी सांगितले. व्हेंटिलेटरबाबत राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये व्हेंटिलेटरबाबत तक्रारी आल्या आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही याबाबतची तक्रार पत्राद्वारे केंद्र सरकारला केली होती.

लसीकरण वेगाने करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करोना चाचण्या वाढवण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. तसेच रुग्णांची संख्या आणि करोनावर मात करणार्‍या रुग्णांची माहितीही देण्यात आली. ग्रामीण भागात ऑक्सिजन पुरवण्याची योजना तयार करावी, तसेच अधिकार्‍यांना लसीकरण वेगाने करण्यासह राज्यांसोबत एकत्र काम करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदी यांनी दिल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com