दिल्ली l Delhi

भारत-चीन सीमेवरील तणाव निवळण्याच्या दिशेनं मोठी घडामोड या आठवड्यात घडली. पँगॉंग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन चीनने सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे.

चीनने या भागात केलेल्या अतिक्रमणानंतर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले होते. तणाव आणखी शिगेला जाण्याची चिन्हं असताना दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेण्यावर सहमती दर्शवली होती.

दरम्यान, चीनच्या सैन्याने पूर्वेकडील लडाखमधील पँगॉन्ग सरोवरावरुन माघार घेण्यास सुरुवात केली आहे. भारतीय लष्कराने मंगळवारी डिसएंगेजमेंटचा एक फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध केला.

यात चिनी सैन्य आपले सामान घेऊन परतताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर चिनी सैन्याने या भागातून त्यांचे बंकर तोडले. तंबू, तोफ आणि गाड्या देखील काढून टाकण्यात आल्या आहेत. सुमारे १० महिने चिनी सैन्याने यावर कब्जा केला होता.

गेल्या आठवड्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत, पूर्व लडाख भागात भारत - चीन सेनेदरम्यान सैन्य माघारीबद्दल करार झाल्याचं म्हटलं होतं. भारत आणि चीन यांच्यात चर्चेच्या नवव्या फेरीत सहमती झाल्यावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिली होती. तसेच द्विपक्षीय चर्चेत भारतानं काहीच गमावलेलं नाही, असा खुलासा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत केला होता. भारत आपली एक इंच भूमीही कोणाला घेऊ देणार नाही. सप्टेंबर २०२० पासून भारत आणि चीनमध्ये वाद निवळण्यासाठी चीनसोबत विविध स्तरावर चर्चा सुरु आहे. पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडील भागात सहमती झाली आहे. दोन्ही देशाच्या सैन्यांनी सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. चीन फिंगर ८ आणि भारत फिंगर ३ या सीमेवर असेल. भारत-चीन सीमेवर पूर्वीसारखी स्थिती बनवण्यात येईल. सध्या पेट्रोलिंग बंद असेल. द्विपक्षीय स्तरावर चर्चेनंतरच एलएसीवर पेट्रोलिंग केलं जाईल. काही मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये मतमतांतर कायम असून त्यावर चर्चा सुरू आहे, असं देखील राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं होतं.