दिल्ली l Delhi

गेल्या काही दिवसांपासून देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. तर आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याचे दिसून आले आहे. या दर वाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत असून कंपन्या मात्र जोरदार कमाई करत आहे. इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर चोहोबाजूने टीका होत आहे.

आज पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी २५ पैशांनी महागले आहे. या दरवाढीनंतर राजस्थानातील श्री गंगानगर या शहारत साधे पेट्रोल १००.०७ रूपये झाले आहे. देशात पहिल्यांदाच साधे पेट्रोल १०० रुपयांवर गेलं आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील परभणी, मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरात पॉवर पेट्रोल १०० रुपयांवर गेले आहे. दुसरीकडे गंगानगरमध्ये डिझेलचा दर ९२ रुपये १३ पैसे इतका झाला आहे.

आजच्या दरवाढीनंतर दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ८९.५४ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७९.९५ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९१.६८ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.०१ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९०.७८ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८३.५४ रुपये झाला आहे.बंगळुरात पेट्रोल ९१.५४ रुपये असून डिझेल ८४.७५ रुपये झाला आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव ९६ रुपये झाला आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८६.९८ रुपये मोजावे लागतील. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८.२५ रुपये आहे.

२०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आतापर्यंत २० वेळ वाढवण्यात आल्या आहेत. पेट्रोलच्या दरात एकूण ५ रुपये ५८ पैसे तर डिझेलच्या किंमतीत ५ रुपये ८३ पैसे इतकी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही शहरांमध्ये प्रीमियम पेट्रोलने शंभरी पार केली आहे. दुसरीकडे मेघालयने पेट्रोल आणि डिझेलच्या रिटेल किंमती पाच रुपयांनी कमी केल्या आहेत.

काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने सरकारवर हल्लाबोल केला. विरोधकांनी तातडीने टॅक कमी करावी अशी मागणी केली आहे. तसेच पेट्रोलिमय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी संसदेत असे म्हटले की, पेट्रोलियम उत्पादनांवरील शु्ल्कात घट करण्यात येणार नाही. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर त्याचा परिणाम होत असल्याचे प्रधान यांनी स्पष्ट केले आहे.