भारतीय अधिकार्‍यांना कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी
देश-विदेश

भारतीय अधिकार्‍यांना कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी

भारतीय उच्चायोगाचे अधिकारी वकिलांसोबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली - पाकिस्तानातील तुरुंगात बंद असलेले भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी दुसर्‍यांदा भारतीय उच्चायोगाला सशर्त कॉन्सुलर अ‍ॅक्सेस देण्यात आला आहे अर्थात भारतीय दूतावासाच्या अधिकार्‍यांना जाधव यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानंतर भारतीय उच्चायोगाचे अधिकारी वकिलांसोबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात दाखल झाले आहेत.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं बुधवारी सायंकाळी उशिरा कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाविरुद्ध याचिका दाखल करण्याची परवानगी दिली होती. आता भारतीय अधिकारी कुलभूषण जाधव यांना पुर्नविचार याचिका दाखल करण्यासाठी मदत करणार आहेत.

पाकिस्ताननं भारतीय उच्चायोगाला दुसर्‍यांदा कॉन्सुलर अ‍ॅक्सेसची परवानगी दिली आहे.

जाधव यांना भेटण्यासाठी पाकिस्ताननं काही अटीही समोर ठेवल्या आहेत. भेटीदरम्यान भारतीय अधिकारी आणि जाधव यांना इंग्रजी भाषेतच संवाद साधावा लागणार आहे. तसंच यावेळी पाकिस्तानी अधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं बुधवारी सायंकाळी उशिरा जाधव किंवा त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधी किंवा इस्लामाबादमध्ये भारताच्या राजदूतांना याचिका दाखल करण्याची परवानगी दिली होती. यापूर्वी पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांनी स्वत: इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचं सांगितलं होतं. परंतु, भारतानं मात्र पाकिस्तानचा हा दावा धुडकावून लावत कॉन्सुलर अ‍ॅक्सेससाठी प्रयत्न सुरूच ठेवले होते.

Deshdoot
www.deshdoot.com