UNGA मध्ये भारतानं पाकिस्तानला तिखट शब्दांमध्ये सुनावलं, पाहा Video

UNGA मध्ये भारतानं पाकिस्तानला तिखट शब्दांमध्ये सुनावलं, पाहा Video

दिल्ली | Delhi

अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहे. यापूर्वी भारताने पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरसंदर्भात केलेल्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे.

दहशतवादाचे समर्थन करणे, दहशतवाद्यांना आसरा देणे, त्यांना रसद पुरविणे हा पाकिस्तानच्या धोरणाचा कायमचा भाग आहे. पाकिस्तानने अवैधपणे बळकावलेला भूभागही भारताचाच आहे. जम्मू, काशीर आणि लद्दाख हे भारताचे अविभाज्य घटक होते, आहेत आणि कायमच राहतील, असे भारताच्या वतीने ठणकावण्यात आले.

संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या पहिल्या महिला सचिव स्नेहा दुबे म्हणाल्या की, आजच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दहशतवादाचे समर्थन केले आहे. जागतिक पातळीवर दहशतवादाचे समर्थन केलेले खपवून घेतले जाणार नाही. पाकिस्तान स्वतःला आग विझवणारा असल्याचे दाखवीत असतो. प्रत्यक्षात तोच आग लावण्याचे काम करतो. पाकिस्तानातील अल्पसंख्य भय आणि सरकारपुरस्कृत दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत. दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र पुरविणारा, त्यांना प्रशिक्षण देणारा आणि आर्थिक बळ पुरविणारा देश हा पाकिस्तानचा चेहेरा जगासमोर उघड झाला आहे, असेही त्या म्हणाल्या.

काय म्हणाले इम्रान खान?

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इम्रान खान यांच्या भाषणाचे ध्वनिमुद्रण ऐकविण्यात आले. त्यामध्ये भारताबरोबर शांततापूर्ण चर्चेच्या बाबी मांडतानाच त्यांनी तब्बल १३ वेळा काश्मीरचा उल्लेख केला. फुटीरतावादी हुरियत नेते सैय्यद अली शहा गिलानी यांच्या अंतयात्रेबाबत गैसमज पसरविण्याचाही प्रयत्न केला. दक्षिण आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काश्मीर विवादावर तोडगा काढणे अनिवार्य असल्याचा दावाही त्यांनी केला. पाकिस्तानबरोबर अर्थपूर्ण चर्चा करण्यासाठी पोषक आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी भारताची असल्याचेही ते म्हणाले.

कोण आहेत स्नेहा दुबे?

स्नेहा दुबेंनी २०११ साली पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्या गोव्यात मोठी झाल्या आणि तिचा बालपणाचा बहुतांश भाग तिथेच गेला. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून (Ferguson College) पदवी घेतल्यानंतर स्नेहा यांनी भूगोल विषयात नवी दिल्लीच्या जवाहरलाल विद्यापीठातून (JNU) पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. स्नेहा भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू होण्यासाठी खूप उत्सुक होत्या. आंतरराष्ट्रीय विषयांमध्ये रस असल्याने, दुबेंनी दिल्लीच्या जेएनयूमधील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये एमफिल अभ्यास पूर्ण केला. प्रवासाची आवड असलेल्या स्नेहाचा असा विश्वास आहे की आयएफएस बनल्याने तिला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची उत्तम संधी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय सेवेसाठी निवड झाल्यानंतर स्नेहा दुबे यांची पहिली नेमणूक बाह्य व्यवहार मंत्रालयामध्ये होती. त्यानंतर ऑगस्ट २०१४ मध्ये तिची माद्रिद येथील भारतीय दूतावासात नियुक्ती झाली.

Related Stories

No stories found.