कुलभूषण जाधव प्रकरणी भारताला वकील नेमण्याची संधी

पाकिस्तानला पुन्हा झटका
कुलभूषण जाधव प्रकरणी भारताला वकील नेमण्याची संधी

नवी दिल्ली | New Delhi -

पाकिस्तानातील तुरुंगात बंद असलेले भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला पुन्हा एकदा झटका बसला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयानेच

पाकिस्तान सरकारला या प्रकरणी धक्का दिला आहे. कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्याची आणखी एक संधी भारताला मिळायला हवी, असे न्यायालयाने गुरूवारी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानकडून या अगोदर भारतीय वकील नियुक्त करण्यास नकार देण्यात आलेला होता. आतापर्यंत कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला अनेकदा आंतरराष्ट्रीयस्तरावर तोंडघशी पडावं लागलेलं आहे.

दुसरीकडे पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी कुलभूषण जाधव प्रकरणी आम्ही राजकीय माध्यामातून पाकिस्तानच्या संपर्कात आहोत. सरकार कुलभूषण जाधव यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शक्य ते सर्व पावलं उचलत असल्याचे सांगितले आहे.

कुलभूषण जाधव पाकिस्तानी तुरुंगात असून हेरगिरीच्या खोटया आरोपाखाली पाकिस्तानने त्यांना अटक केली आहे. आयसीजेच्या निकालानुसार, काउंन्सलर अ‍ॅक्सेस तसेच मुक्त आणि निष्पक्ष सुनावणी पूर्व अट असल्याची भारताने पाकिस्तानला आठवण करुन दिली आहे.

या अगोदर कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली होती. भारतानं याप्रकरणी प्रतिक्रिया देत पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव आणत तो निर्णय घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com