देशात पाच लाखांपेक्षा अधिक रुग्णांची करोनावर मात

24 तासांत देशात 27 हजार 114 नवीन करोना रुग्णांची वाढ
देशात पाच लाखांपेक्षा अधिक रुग्णांची करोनावर मात

नवी दिल्ली |new delhi - करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात वाढत असला तरी, दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त होणार्‍यांची संख्या देखील वाढत आहे. देशात सध्याच्या घडीला करोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येने पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत तब्बल 5 लाख 15 हजार 385 जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

देशात उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत, करोनामुक्त होणार्‍यांची संख्या जास्त आहे. सध्या देशातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या 2 लाख 31 हजार 978 आहे. देशपातळीवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 62.78 टक्के झाले आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालायच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

देशातील करोनाबाधितांची संख्या 8 लाखांच्या पुढे गेली आहे. 24 तासांत देशात 27 हजार 114 नवीन करोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 519 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या 8 लाख 20 हजार 916 झाली आहे. देशात आतापर्यंत 22 हजार 123 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.

दरम्यान, अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सातत्याने विविध राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ताज्या माहितीनुसार, रुग्ण वाढीची ही साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी गरजेप्रमाणे स्थानिक पातळीवर पुन्हा लॉकडाउन करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, राज्यात पुणे आणि ठाण्यात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर केरळमधील थिरुवअनंतपुरम तसेच संपूर्ण उत्तर प्रदेशात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com