दिल्ली l Delhi

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कामातून विश्वविक्रम केला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली आहे. यासंबधी स्वत: नितीन गडकरी यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

दिल्ली- वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या कामादरम्यान भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) सर्वाधिक प्रमाणात काँक्रिटचा वापर करून द्रुतगती महामार्गाचे काम करण्याचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. दिल्ली-वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग तयार करताना २४ तासांच्या कालावधीत झालेल्या कामामुळे चार विक्रम मोडीत निघाले आहेत. देशासाठी पायाभूत सुविधा पूर्वी पेक्षा अधिक वेगाने तयार करण्यात येत आहेत. केवळ नवीन मापदंड घालून दिले नाही, तर आम्ही जागतिक विक्रमही केला आहे, असे नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

गुजरातमध्ये सध्या बडोदा ते भरुच एक्सप्रेस वेचे काम सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी म्हणजेच २ फेब्रुवारी रोजी २ किमी लांबीचा आणि १८.७५ मीटर रुंदीचा महामार्ग केवळ २४ तासात पूर्ण झाला. यासाठी १.१० लाख सिमेंट पोते वापर करण्यात आला. ज्यासाठी ५ कोटी रुपये लागले आहेत. या चार जागतिक विक्रमांपैकी पहिले म्हणजे १२ हजार टन सिमेंट काँक्रीट तयार करणे, दुसरे म्हणजे हे कॉंक्रिट इतक्या वेगाने अंथरणे, तिसरा एक फूट जाड आणि १८.७५ मीटर रुंदीचे बांधकाम आहे आणि चौथा विक्रम म्हणजे रिजिड पेवमेंट क्वालिटीला मेनटेन करण्याचा आहे. ही सर्व कामे अवघ्या २४ तासात करण्यात आली आणि अशा प्रकारे या एक्सप्रेस वेने एकाच वेळी चार जागतिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

याबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष शब्दांमध्ये त्यांचे अभिनंदन केले आहे.