
दिल्ली | Delhi
खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जरच्या खुनमागे भारतीय गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याचा दावा कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी केला होता. यामुळे दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहे. या प्रकरणाचे पडसाद जागतिक स्तरावर उमटू लागले आहेत.
अमेरिका-ऑस्ट्रेलियानं कॅनडाची बाजू घेतली असून भारतानं तपासात सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचवेळी भारतानं हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हरदीप सिंग निज्जरसह कॅनडात भारत विरोधी कारवाया करणाऱ्यांची यादीच एनआयएनं दोन दिवसांपूर्वी जारी केली होती. आता एनआयएनं कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या चंदीगडमधील घरावर छापा टाकून जप्तीची कारवाई केली आहे.
पन्नू शीख फॉर जस्टीस (SFJ) या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख आहे. तो कॅनडा आणि इतर देशांना भारतविरोधी वक्तव्ये करत असतो. नुकत्याच झालेल्या कॅनडा-भारत वादात त्यांने कॅनडात राहणाऱ्या हिंदूंनाही धमकावले होते. एनआयएने अमृतसरच्या खानकोट गावात पन्नूची 46 कनालची मालमत्ता जप्त केली आहे. खानकोट हे पन्नूचे वडिलोपार्जित गाव आहे. इथे शेतजमीन आहे. पन्नूचे घर चंदीगडच्या सेक्टर 15 सी मध्ये आहे. ते 2020 च्या आधी जप्त करण्यात आले होते. आता एनआयएने ही मालमत्ता ताब्यात घेतली आहे. कायदेशीररित्या, पन्नू आता या मालमत्तांचा मालक नाही. ही मालमत्ता आता सरकारची आहे.
कोण आहे पन्नू?
गुरपतवंत सिंग पन्नू हा मूळचा पंजाबमधील खानकोट येथील असून तो सध्या अमेरिकेचा नागरिक आहे. पंजाब विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेऊन पन्नू परदेशात गेला. तेव्हापासून तो कॅनडा आणि अमेरिकेत राहत आहे. परदेशात राहून तो खलिस्तानी कारवाया करत असून वेळोवेळी व्हिडीओ जारी करून भारत सरकारविरुद्ध अनेकदा त्यानं गरळ ओकली. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीनं, त्याने शिख फॉर जस्टिस ऑर्गनायझेशन (SFJ) नावाची संघटना देखील स्थापन केली आहे. या संघटनेवर २०१९ मध्ये भारताने बंदी घातली होती.