
दिल्ली | Delhi
तुर्की आणि सीरियानंतर आता न्यूझीलंड हादरलं आहे. न्यूझीलंडमध्येही (New Zealand) भूकंपाचा झटका (Earthquake) बसला आहे. या भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे.
न्यूझीलंडच्या वेलिंग्टन शहराच्या वायव्येला बुधवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्टापासून खाली ५७.४ किमी खोलीवर आणि पॅरापरामुच्या उत्तर-पश्चिमेला ५० किमी अंतरावर होता. संध्याकाळी साधारण ७.३८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे किती नुकसान झालं आहे याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
दरम्यान न्यूझीलंडच्या डोक्यावर आठवड्याभरापासून सायक्लोन गॅब्रियल या वादळाचा धोका घोंघावत आहे. या वादळामुळे न्यूझीलंडमध्ये अनेक ठिकाणी वादळी पाऊसही झाला आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या अनेक भागात महापूर आला आहे.
वादळ आणि महापुरामुळे न्यूझीलंडमध्ये हाहाकार माजला असून परिस्थिती इतकी भीषण झालीय की संपूर्ण देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या ६ क्षेत्रांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. हे संकट सुरू असतानाच आता भूकंपाचा तीव्र झटका बसल्याने न्यूझीलंडचे नागरिक भयभीत झाले आहेत.
सागरी वादळामुळे न्यूझीलंडच्या समुद्रात आक्राळविक्राळ लाटा उसळत आहेत. अनेक भागात प्रचंड पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक भागात भूस्खलन होताना दिसत आहे. तर महापुरांमुळे घरे वाहून गेली आहेत. त्यामुळे नागरिक चांगलेच धस्तावून गेले आहेत.