
दिल्ली | Delhi
नवीन वर्षाच्या पहाटे दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली. या घटनेनं दिल्लीच नव्हे, तर देशही हादरला. कारच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर दुचाकीस्वार २० वर्षीय तरुणीला कारचालकाने १२ किलोमीटरपर्यंत फरफरट नेलं. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीत सुलतानपुरी भागात एका कारने दुचाकीस्वार तरुणीला धडक दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतरही कार न थांबवता चालकाने मृत तरुणीला सुलतानपूरी ते कांझावालापर्यंत फरफटत नेलं. अंजली सिंग असं या तरुणीचं नाव आहे. अपघाताचा तपास करताना अंजलीबरोबर आणखी एक तरुणी दुचाकीवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
दिल्ली पोलीस आज या तरुणीचा जबाब नोंदविणार आहेत. या दोन्ही तरुणी एका हॉटेलमध्ये उपस्थित होत्या. अपघातापूर्वी त्यांनी तिथे काही मित्रांसोबत बर्थ डे पार्टीदेखील केली. आता या मित्रांची देखील चौकशी केली जात आहे.
रविवारी रात्री ज्या बलेनो कारला अंजलीची स्कूटी धडकली त्या बलेनो कारमधील पाचही तरुण हे दारुच्या नशेत होते. दुसऱ्या तरुणीला किरकोळ जखमा झाल्या आहेत. अपघातानंतर ती तेथून घाबरून पळून गेली. तर अंजली ही अपघातावेळी कारच्या समोर पडली आणि कार तिच्यावरून गेली.
दरम्यान दिल्लीतील या घटनेनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा अध्यक्षा स्वाती माहिवाल यांनी पोलिसांना नोटिस जारी केली आहे. याशिवाय पोलिसांनी आरोपींवर कोणती कलमं लावली आहेत, याचीही विचारणा माहिवाल यांनी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत अपघाताच्या आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे.