नवी दिल्ली -

नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत शेतकर्यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी(25 डिसेंबर) देशभरातील शेतकर्यांशी संवाद साधला.

यावेळी मोदींनी दिल्लीतील आंदोलनावर भाष्य केलं. काही राजकीय पक्ष शेतकर्यांची दिशाभूल करत आहेत. कोणतेही मुद्दे असतील तर चर्चेला या, मात्र माथी भडकवू नका असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदींच्या या आवाहनानंतर शेतकरी संघटना पुढील रणनीती ठरवणार आहेत. त्यासाठी आज शनिवारी (25 डिसेंबर) किसान संयुक्त मोर्चाने बैठकीचे आयोजन केलेे आहे. या बैठकीत शेतकरी आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने नव्या धोरणाने काम सुरु केले आहे. शेतकर्यांना भविष्याच्या दृष्टीने सक्षम करण्यावर भर दिला. जगामध्ये काय नवे घडतेय, त्याची माहिती घेतली. सखोल अभ्यास केला आणि त्या दृष्टीने काम केले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी त्यांचे उत्पादन हवे तिथे विकू शकतात. जिथे तुम्हाला चांगला मोबदला मिळेल, तिथे तुम्ही पिकवलेली वस्तू विका. तुम्हाला बाजारपेठेत, खरेदीदारांना उत्पादन विकायचे असेल, तर विकू शकता. शेतकर्यांना हे स्वातंत्र्य मिळत असेल तर त्या सुधारणांमध्ये चुकीचे काय आहे? असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी शेतकर्यांना विचारला आहे.