
नागपूर | Nagpur
दैव बलवत्तर असलेला माणूस मृत्युच्या दाढेतूनही परत येतो, अशा अनेक घटना आपण वाचल्या किंवा पाहिल्या आहेत. कित्येक अपघातातून एखादी व्यक्ती वाचते, तेव्हा देव तारी त्याला कोण मारी ही म्हण सार्थकी लागत असते. नागपूरमधून एक आश्चर्यचकीत करणारी आणि तितकीच दिलासादायक बातमी समोर आली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीला पुन्हा जीवदान (Heart Attack Patient Alive After 45 Min) मिळाले आहे.
येथील ३८ वर्षीय व्यक्तीला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता, त्यामुळे कुटुंबीयांना त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी, त्यांच्या ह्रदयाचे ठोके बंद पडले होते. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर ४५ मिनिटांनी त्यांच्या ह्रदयाचे ठोके सुरू झाले. जवळपास ४५ दिवस आयसीयूमध्ये ठेवल्यानंतर ती व्यक्ती पूर्णपणे बरी झाली आहे. डॉक्टर देखील या घटनेने हैराण झाले आहेत. डॉक्टरही याला चमत्कार मानत आहेत.
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, या रुग्णाच्या हृदयाचे ठोके ४० मिनिटांसाठी पूर्णपणे बंद झाले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ऋषी लोहिया यांनी त्यांना ४० मिनिटांसाठी सीपीआर देण्याचा निर्णय घेतला. मॉनिटरवर रुग्णाचे व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशन दिसत होते. रुग्णाला सीपीआरसह डिफिब्रिलेशन शॉक दिले जात होते. या काळात रक्ताभिसरण किंवा ह्रदयाचे ठोके सुरू न झाल्यास सीपीआर थांबवण्यात येते. मात्र, येथील डॉ. लोहियांनी अधिक वेळ सीपीआर सुरू ठेऊन केलेल्या प्रयत्नांना यश आले.
रुग्णालयातील नोंदीनुसार रुग्णाला ४५ मिनिटांसाठी सीपीआर देण्यात आला. डॉ. लोहिया म्हणाले की, 'पहिला सीपीआर २० मिनिटे दिला. त्यावेळी रुग्णाच्या हृदयाचे ठोके ३० सेकंद चालू झाले होते. रुग्णाला कार्डियाक मसाजसोबत शॉकही दिले जात आहेत. त्यामुळे हृदय गती पूर्ववत होण्यास मदत झाली. इतका वेळ मसाज करूनही रुग्णाच्या बरगड्या फुटल्या नाहीत आणि धक्क्याने त्याची त्वचाही भाजली नाही. योग्य उपचारांमुळे हे शक्य झाले.'
संबंधित रुग्ण आयटी कंपनीत नोकरीला आहेत. २५ ऑगस्ट रोजी संबंधित रुग्णाला KIMS-Kingsway रुग्णालयात आणण्यात आले होते. सुरुवातीचे ३ ते ४ दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर, ४० दिवस त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. आयसीयु टीम त्यांच्या देखरेखेखाली होती. या आयसीयू टीममध्ये नेफ्रोलॉजिस्ट डॉ अश्विनी खांडेकर आणि सर्जन डॉ. सुरजीत हाजरा यांचा समावेश होता.