मुंबई-दिल्ली विजयी हॅट्रिकसाठी सज्ज; थोड्याच वेळात सुरु होणार सामना

मुंबई-दिल्ली विजयी हॅट्रिकसाठी सज्ज; थोड्याच वेळात सुरु होणार सामना

चेन्नई | आयपीएल २०२१ मध्ये आज (दि २०) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण सायंकाळी ७:३० वाजता करण्यात येणार आहे.

दिल्ली संघाने सलामी सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जवर मात करून विजयी सुरुवात केली होती. पण दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने त्यांच्यावर मात करून त्यांचा विजयी रथ रोखला. पंजाब किंग्जवरील विजयाने दिल्ली संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे...

दिल्ली संघ सध्या गुणतालिकेत ४ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. आज मुंबईवर मात करून अव्वल दोन स्थानांमध्ये झेप घेण्याचा दिल्ली संघाचा मानस आहे. दुसरीकडे मुंबई संघाने सलामी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरविरुद्ध सलामी सामन्यात २ गड्यांनी पराभव पत्कारून कोलकाता आणि हैद्राबाद संघावर विजय संपादन करून आपली विजयी लय परत मिळवली आहे.

आता हीच लय कायम ठेवण्यासाठी मुंबई संघ आज मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. दुबईमध्ये पार पडलेल्या आयपीएल हंगामात हे संघ ४ वेळा एकमेकांसमोर आले होते. यात ४ सामने मुंबईने जिंकले होते .

दिल्ली फ़लंदाजांवर मुंबईच्या जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी दडपण आणून दिल्ली संघाच्या फलंदाजाना धावा काढण्यासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले होते. यंदाच्या हंगामातही बोल्ट आणि बुमराह जोडी चांगलीच फॉर्मात आहे.

त्यामुळे दिल्ली संघ या सामन्यातून मुंबईवर मात करण्यासाठी काय तोडगा काढतो? यावर सामन्याचा निकाल अवलंबून आहे .

दोन्ही संघ स्पर्धेमध्ये एकूण २८ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यात मुंबईने १६ तर दिल्लीने १२ लढती जिंकल्या आहेत. दोन्ही संघांमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत विविधता असून एक रोमांचक सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी सज्ज आहेत.

दिल्ली संघाच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ अँड्रिक नोकिया कोरोनामुक्त झाला असून, त्याने आपला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याला संधी दिली जाऊ शकते.

दिल्ली संघासाठी जमेची बाजू म्हणजे कर्णधार पंत , सलामीवीर शिखर धवन फॉर्मात आहेत. त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याची संधी आहे. तर संघासाठी डोकेदुखी म्हणजे अजिंक्य रहाणेला अद्याप आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

पंजाबविरुद्ध सामन्यात रहाणेच्या स्थानावर संधी देण्यात आलेला स्टीव्ह स्मीथ मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला आहे. त्याच्याकडून चांगली कामगिरी संघाला अपेक्षित आहे. गोलंदाजीत आवेश खान आणि क्रिस वोक्स चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना इतर गोलंदाजही चांगली साथ देत आहेत.

दिल्ली संघाच्या फलंदाजीची मदार शिखर धवन , अजिंक्य रहाणे , पृथ्वी शॉ , स्टीव्ह स्मीथ , रिषभ पंत , शिमरॉन हेटमायर यांच्यावर असणार आहे. अष्टपैलूंमध्ये क्रिस वोक्स , टॉम करण , अक्षर पटेल आहेत. गोलंदाजीत अमित मिश्रा , आर अश्विन , ईशांत शर्मा , उमेश यादव , कांगिसो रबाडा आहेत.

मुंबई संघासाठी जमेची बाजू म्हणजे सूर्यकुमार यादव चांगल्या फॉर्मात आहे. कर्णधार रोहित शर्मा देखील फॉर्मात परतला असल्याचे त्याने संकेत दिले आहेत. मात्र संघासाठी चिंतेची गोष्ट म्हणजे संघाची मधली फळी किरॉन पोलार्ड , ईशान किशन हार्दिक पंड्या , कृणाल पंड्या मागील दोन्ही सामन्यांमध्ये सपशेल अपयशी ठरली आहे. त्यांना आपली कामगिरी सुधारण्याची सुरेख संधी आहे

मुंबई संघाच्या फलंदाजीची मदार रोहित शर्मा , क्विंटन डिकॉक , क्रिस लीन , सूर्यकुमार यादव , ईशान किशन , सौरभ तिवारी , आदित्य तारे , यांच्यावर असणार आहे. अष्टपैलूंमध्ये किरॉन पोलार्ड , जेम्स निशम , हार्दिक पंड्या , कृणाल पंड्या , नेथन कुलतेर्नेल आहेत. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट , धवल कुलकर्णी , जसप्रीत बुमराह , जयंत यादव , पियुष चावला , राहुल चाहर आहेत.

- सलिल परांजपे नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com