
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंजाबमधील पठाणकोट येथील वायूदलाच्या तळावर सात वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सात भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्याच्या सूत्रधाराची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. शाहिद लतीफ असे या दहशतवाद्याचे नाव असून पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. बुधवारी सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.
शाहिद लतीफ हा भारत सरकारच्या मोस्ट वाँटेड यादीत असलेला दहशतवादी असून NIAने शाहिदविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. शाहिद लतीफ जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता. तो जैशच्या दहशतवाद्यांना भारतात पाठवत असत.
शाहिद लतीफ हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरानवाला येथील रहिवासी होता. तो सियालकोट सेक्टरचा कमांडर होता, तो भारतात दहशतवाद्यांच्या प्रवेशावर लक्ष ठेवत असत आणि दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत होता.
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सियालकोटजवळच्या एका मशिदीत शाहीदची हत्या करण्यात आली आहे. दोन हल्लेखोर मोटारसायकलवरून आले असता, त्यांनी शाहीदवर गोळ्या झाडल्या आणि तिथून फरार झाले. या हत्याकांडानंतर पोलिसांनी सियालकोट भागात नाकाबंदी केली असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन हाती घेतले आहे.
शाहिद लतीफला १२ नोव्हेंबर १९९४ रोजी अटक करण्यात आली होती आणि १६ वर्षे भारतीय तुरुंगात राहिल्यानंतर २०१० मध्ये वाघा बॉर्डर मार्गे त्याला हद्दपार करण्यात आले. त्यानंतर सहा वर्षांनी २०१६ मध्ये त्याने जैशचे दहशतवादी भारतात पाठवून पठाणकोट येथील वायूदलाच्या तळावर हल्ला घडवून आणला होता ज्यात भारताचे सात जवान शहीद झाले होते.
२०१६ मध्ये पंजाबमधील पठाणकोट येथील एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता. या हल्ल्यात लष्कराचे सात जवान शहीद झाले होते. पठाणकोट एअरफोर्स स्टेशन सीमेजवळ आहे.