मान्सून केरळात 30 मे रोजी धडकणार - स्कायमेट

देशात समाधानकारक पावसाचा अंदाज
मान्सून केरळात 30 मे रोजी धडकणार - स्कायमेट

नवी दिल्ली -

मान्सून केरळमध्ये येत्या 1 जूनला दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला असतानाच, स्कायमेट या खाजगी संस्थेने यंदा निर्धारित वेळेच्या दोन दिवस आधी म्हणजे 30 मे रोजी मान्सूनचे केरळात आगमन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाल्याने, मान्सून वेळेच्या आधीच येण्यासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मान्सूनचे केरळातील आगमन दोन दिवस आधीच होईल, असे स्कायमेटने म्हटले आहे. देशात यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात मान्सूनचा पाऊस समाधानकारक राहील. 97 ते 104 टक्के अशी या पावसाची सरासरी राहील. आमच्या या ताज्या अंदाजात दोन दिवसांचे अंतर राहू शकेल. मान्सूनचे आगमन वेशीवर होत असताना वातावरणात होणारा बदल लक्षात घेऊन हा संभाव्य बदल होऊ शकतो, असेही स्कायमेटच्या अंदाजात नमूद करण्यात आले आहे.

समुद्रात निर्माण होणार्‍या स्थितीवर मान्सूनचे आगमन अवलंबून असते. सध्या तौत्के नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे आणि त्याच्या प्रभावाने वार्‍यांची गतीही वाढणार आहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी ही स्थिती पोषक असल्यानेच आम्ही उपरोक्त अंदाज व्यक्त केला आहे. आम्ही यापूर्वीच देशात मान्सूनच्या चार महिन्यांच्या काळात 97 ते 104 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे आणि त्यावर आम्ही आताही ठाम आहोत. देशात दुष्काळाची स्थिती निर्माण होणार नाही, असाच हा पाऊस राहणार आहे, असेही स्कायमेटने म्हटले आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार देशात चार महिन्यांच्या काळात 97 ते 104 टक्के पाऊस पडणार असला, तरी त्यात काही बदलही होऊ शकतो.

जून : सरासरी 97 टक्के

जुलै : 97 ते 103 टक्के

ऑगस्ट : 99 टक्के

सप्टेंबर 96 ते 102 टक्के

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com