
नवी दिल्ली | New Delhi
काही दिवसांपूर्वी म्हणजेच ०१ ऑक्टोबर रोजी मोदी सरकारने (Modi Government) व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial Gas Cylinders) दरात २०४ रुपयांनी वाढ केली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला होता. त्यानंतर आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी एलपीजीवरील अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana) लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम प्रति एलपीजी सिलिंडर २०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे...
याबाबत बोलताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Minister Anurag Thakur) यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) झाली. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने आम्ही एलपीजी सिलेंडर (LPG cylinder) २०० रुपयांनी कमी केले होते. ही किंमत १,१०० रुपयांवरून ९०० रुपयांपर्यंत कमी झाली. त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ७०० रुपयांना गॅस मिळू लागला. त्यानंतर आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या भगिनींना ३०० रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता ६०० रुपयांना गॅस सिलेंडर मिळणार आहे, असे त्यांनी म्हटले.
तसेच पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तेलंगणात (Telangana) वनदेवतेच्या नावाने केंद्रीय आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हे केंद्रीय आदिवासी विद्यापीठ ८८९ कोटी रुपयांचे असणार आहे. तर केंद्रीय हळद मंडळाच्या स्थापनेलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यासोबतच भारत हा तुरीचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक आहे. त्यामुळे भारताने ८,४०० कोटींच्या हळदीच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवले असल्याची माहिती मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.