मोदी सरकारमुळे लसीकरणाचे तीनतेरा

सोनिया गांधी यांचा आरोप : पक्षनेत्यांकडून घेतला आढावा
मोदी सरकारमुळे लसीकरणाचे तीनतेरा

नवी दिल्ली -

मोदी सरकारकडून करोना प्रतिबंधक लसीकरणाचे व्यवस्थापन चुकले असून त्यामुळेच लसीकरणाचे तीन तेरा वाजले आहेत असा

आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे. सरकारने लसीची निर्यात केल्यानेच देशात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे असेही त्या म्हणाल्या. देशातील काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षनेते यांच्याशी शनिवारी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत करोना स्थिती व लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.

या बैठकीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, महाराष्ट्र विधिमडंळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, झारखंडचे अर्थमंत्री व झारखंड प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामेश्वर सोरेन यांच्यासह काँग्रेस अध्यक्षांच्या सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. काँग्रेस शासित राज्यांसोबत केंद्र सरकार दूजाभाव करत असून करोना प्रतिबंधक लस, टेस्टिंग किट, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सीजन पुरवठा व इतर आवश्यक उपकरणांच्या वाटपात मोठ्या प्रमाणात असमतोल दिसून येत आहे, असा आरोप त्यांनी केला. करोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले काँग्रेस शासित राज्यांनी उचलली पाहिजेत. मात्र, त्याचा गरीब जनतेच्या उपजिवीकेवर विपरीत परिणाम होऊ नये याचीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे असे मत खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, महाराष्ट्र विकास आघाडी सरकार करोना विरोधातील लढाई पूर्ण ताकदीने लढत आहे. देशात सर्वात जास्त करोना चाचण्या महाराष्ट्रात केल्या जात आहेत. लसीकरणाच्या बाबतीतही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात नाही, असे सांगीतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com