एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आता महामारीचे शिक्षण
देश-विदेश

एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आता महामारीचे शिक्षण

भारतीय वैद्यकीय परिषदेचा महत्त्वपूर्ण निर्णय

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली |New Delhi -

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) वैद्यकीय अभ्यासक्रमात ‘महामारी व्यवस्थापन’ या विषयाचा समावेश केला आहे. Medical Council of India (MCI)

बॅचलर ऑफ़ मेडिसिन अ‍ॅण्ड बॅचलर ऑ़फ सर्जरी (एमबीबीएस) विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. एसीआयचे अध्यक्ष डॉ. विनोद कुमार पॉल यांनी हा निर्णय जाहीर केला. आगामी काळातही करोनासारखी नवीन महामारी आली तर त्याचा सामना करण्यास डॉक्टरांना सक्षम करण्यासाठी एमसीआय आणि नीती आयोगाने एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात महामारी व्यवस्थापन म्हणजेच पॅन्डेमिक मॅनेजमेंट या विषयाचा समावेश करण्याची भूमिका घेतली आहे.

करोना महामारीने पुरते जग हैराण झाले आहे. लाखो लोकांना करोनाने ग्रासले आहे. लाखोंचे बळी गेले आहेत. अर्थव्यवस्थेला करोनामुळे फटका बसला आहे. अशा महामारीचा आताच नव्हे तर भविष्यातही प्रभावीपणे सामना करण्याइतकी वैद्यकीय व्यवस्था सक्षम बनवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, करोनाने गेल्या सहा महिन्यांमध्ये वैद्यकीय क्षेत्रासमोर आव्हान निर्माण केले. करोना संसर्ग रोखताना यंत्रणांची दमछाक होत आहे. अद्याप करोना प्रतिबंधक लस किंवा औषध नसल्याने रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी जीवाचे रान करत आहेत.

मात्र सध्याच्या परिस्थितीत करोनासारख्या संसर्गजन्य साथीच्या आजारात केवळ साथरोग आणि औषधवैद्यक शास्त्र विभागातील तज्ज्ञ यांच्यावर खरी भिस्त होती. कालांतराने आपल्याकडे सर्वच पॅथीच्या तज्ज्ञ आणि इतर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, यामध्ये खूप वेळ वाया गेला. शिवाय अशा आजाराची भीती डॉक्टरांमध्ये असल्याने तेही स्वत:ला सुरक्षित मानत नव्हते. या सर्व गोष्टींवर परिणामकारक उपाय म्हणजे विद्यार्थी दशेतच त्यांना या सर्व गोष्टींचे ज्ञान अवगत व्हावे यादृष्टीने हा सखोल अभ्यासक्रम बनवण्याचा निर्णय भारतीय वैद्यकीय परिषदेने घेतला.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या 12 तज्ज्ञांनी हा अभ्यासक्रम बनवला आहे. दीड महिने सखोल अभ्यास करून या समितीने महामारी व्यवस्थापन अभ्यासक्रम बनवला. एमबीबीएसच्या सर्व वर्षांमध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यात यापूर्वी जगामध्ये आलेल्या महामारीचा इतिहास, आजारांचे स्वरुप, रुग्ण तपासणी, उपचार, लस संशोधन याशिवाय कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी, व्यवस्थापन आदींचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या अभ्यासाला गुण असल्यामुळे विद्यार्थ्यांना या सर्व बाबींचा अभ्यास करावाच लागणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com