Manipur violence : मणिपूरमध्ये हिंसाचाराचे ५४ बळी, राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी

मणिपूरमध्ये का उफाळलाय हिंसाचार?
Manipur violence : मणिपूरमध्ये हिंसाचाराचे ५४ बळी, राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी

दिल्ली | Delhi

मागील काही दिवासंपासून मणिपूरमध्ये हिंसाचार भडकला आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १० हजार जवान उतरले आहेत.

मणिपूरमधील हिंसाचारामध्ये मृत झालेल्या ५४ जणांपैकी १६ जणांचे मृतदेह चुराचंदपूर येथील जिल्हा रुग्णालयात आहेत तर १५ जणांचे मृतदेह जवाहरलाल इम्फाळा येथील नेहरु इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे ठेवण्यात आलेले आहेत.

मणिपूरमध्ये ५३ टक्के असलेल्या मैतेई समाजाला आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू असल्याने मणिपूरमध्ये ४० टक्के लोकसंख्येच्या कुकी व नागा या आदिवासी समाजांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातूनच आदिवासींच्या मोर्चात मैतेई समाजातील नागरिक व त्यांच्या घरांवर झालेल्या हल्ल्यानंतर हा हिंसाचार भडकला. दोन्ही समाजांनी एकमेकांची घरे, मालमत्ता, प्रार्थनास्थळे लक्ष्य केल्याने राजधानी इम्फाळसह डोंगराळ भागांतही हिंसाचाराचे लोण पसरले.

परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले असून अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश राज्य सरकारकडून सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत. या ताज्या हिंसाचारामुळे नऊ हजार लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. हिंसाचारग्रस्त भागामध्ये बुधवारी रात्रीच सुरक्षा दले दाखल झाली होती. त्यांना गुरुवार सकाळपर्यंत हिंसाचारावर नियंत्रण प्रस्थापित करण्यात यश आल्याचे सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. अनेक ठिकाणी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा दलांकडून ध्वज संचलनाचे आयोजन करण्यात आले होते.

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप शशी थरूर यांनी केला आहे. वाढता हिंसाचार पाहता राज्य सरकार हे सगळं रोखण्यात अपयशी ठरत आहे, असं दिसतंय. हा हिंसाचार थांबणं गरजेचं आहे, त्यामुळे मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी थरूर यांनी केली आहे.

मणिपूरमधील हिंसक संघर्षांदरम्यान गुरुवारी भाजप आमदार वुंगझागिन वाल्टे (MLA Vungzagin Walte) यांच्यावर इम्फाळमध्ये (Imphal) जमावाने हल्ला केला. भाजप आमदार वुंगजागिन वाल्टे हे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N Biren Singh) यांची भेट घेऊन राज्य सचिवालयातून परतत असताना हा हल्ला झाला. आमदाराची प्रकृती गंभीर असून त्यांना चांगल्या उपचारासाठी एअरलिफ्टने नवी दिल्लीला नेण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com