‘यामुळे’ शेतकर्‍यांना दिलेले 3 हजार कोटी केंद्र सरकार परत घेणार

शेतकर्‍यांना सरकारने पाठवल्या नोटिसा
‘यामुळे’ शेतकर्‍यांना दिलेले 3 हजार कोटी केंद्र सरकार परत घेणार

नवी दिल्ली / New Delhi - केंद्र सरकारने गरीब शेतकर्‍यांसाठी सुरू केलेल्या किसान विकास योजनेंतर्गत वाटप केलेल्या पैशांचा लाभ हा अनेक अपात्र शेतकर्‍यांनी घेतला असल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकारने संसदेत जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत एकूण 42 लाख अपात्र शेतकर्‍यांनी नोंदणी केली असून, त्यांच्या खात्यावर आतापर्यंत 3 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. आता सरकारने हे पैसे परत घेण्यासाठी हालचाल सुरु केली आहे.

केंद्र सरकारच्या किसान विकास योजनेनुसार, पात्र शेतकर्‍यांना प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये देण्यात येतात. वर्षातून तीन हफ्त्यांमध्ये ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली जाते. मात्र, या योजनेला पात्र ठरणारा शेतकरी हा करदाता नसावा, ही प्रमुख अट आहे. जो करदाता असेल तो शेतकरी गरीब मानला जात नाही. पूर्णवेळ शेती करणारा आणि शेतीवरच उपजीविका अवलंबून असणार्‍या शेतकर्‍यांना या योजनेसाठी ग्राह्य धरले जाते.

अनेक करदात्या शेतकर्‍यांनी या योजनेसाठी आपले नाव नोंदविले असून, त्यांच्या नावावर रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारे करदात्या शेतकर्‍यांना पैसे देणे, हे एकप्रकारे खर्‍या लाभार्थींना त्यापासून वंचित ठेवणे ठरेल, असे सांगत अपात्र शेतकर्‍यांना पैसे परत देण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्यासाठी अशा सर्व अपात्र शेतकर्‍यांना सरकारने नोटिसा पाठवल्या आहेत.

कोणत्या राज्यात किती शेतकरी?

या योजनेतून पैसे मिळालेल्या अपात्र शेतकर्‍यांचे सर्वाधिक प्रमाण आसाममध्ये आहे. आसामामध्ये 8 लाख 35 हजार शेतकर्‍यांच्या नावे 554 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. तामिळनाडूत 7 लाख 22 हजार शेतकर्‍यांच्या नावे 340 कोटी रुपये, पंजाबमध्ये 5 लाख 62 हजार शेतकर्‍यांच्या नावे 437 कोटी रुपये तर महाराष्ट्रात 4 लाख 45 हजार शेतकर्‍यांच्या नावे 358 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. हे पैसे आता केंद्र सरकार परत घेणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com