
जोशीमठ | Joshimath
उत्तराखंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोशीमठमध्ये अनेक ठिकाणी जमीन खचत आहे. शेकडो घरांना तडे गेले आहेत. घरे कधीही कोसळू शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जोशीमठच्या लोकांमध्ये प्रचंड भीती आहे.
भूस्खलनामुळं शहरातील भगवती देवीचे मंदिर कोसळले आहे. सिंहधार वॉर्डमध्ये ही घटना घडली आहे. आत्तापर्यंत फक्त घराच्या भिंतीना तडे गेले होते. मात्र आता इमारतीही कोसळू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
जोशीमठ शहरातील आत्तापर्यंत ६०३ घरांना तडे गेले आहेत. त्यामुळं प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही कुटुंबांनी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आत्तापर्यंत ४४ कुटुंबांना येथून दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आलं आहे. या नागरिकांचे घर पुर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. घराच्या भिंतींपाठोपाठ घराच्या फरशीलाही तडा गेल्या आहेत.
जोशीमठ हे भारतातील सर्वात मोठे भूकंपप्रवण क्षेत्र असून ते ५ व्या झोनमध्ये येते. २०११ च्या जनगणना आकडेवारीनुसार या भागात जवळपास ४००० घर होती. यात १७००० लोक राहत होते. पण, आता ही वस्ती वाढली असून त्याचा इथल्या डोंगराळ जमिनीवर थेट मारा होत आहे. त्यामूळे जोशीमठाचे अस्तित्व लवकरच पुसण्याच्या मार्गावर आहे.
दरम्यान भूवैज्ञानिकांनी आधीच याबाबत इशारा दिला होता. ऑगस्ट २०२२ मध्ये जोशीमठाचा सर्व्हे करण्यात आला होता. २००९ मध्ये जलविद्युत प्रकल्पासाठी एनटीपीसी बोगद्याच्या घातक परिणामांची शक्यता वर्तवली होती.
बोगदा खोदण्यासाठी जमिनीखालील पाण्याची संरचना खिळखिळी केली. यामुळे रोज ६-७ लाख लिटर पाणी निघत आहे. आता जोशीमठ शहराचे अस्तित्व वाचवणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे सरकारने लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.