वॉशिंगटन -

जो बायडन यांनी आज अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. तर कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून

शपथ घेतली. शपथविधी सोहळा कॅपिटल हिलमध्ये पार पडला. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा या समारंभास उपस्थित होते.

नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची सुरक्षा आणि शपथविधी सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून वॉशिंग्टनमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. जवळपास 25 हजारांहून अधिक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. भारतीय वेळेनुसार, रात्री साडेदहा वाजता राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन आणि उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

शपथविधी सोहळ्या दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या शपथविधी सोहळ्याचा संपूर्ण आराखडा बदलण्यात आला होता. जो बायडन यांच्या टीममधील अधिकार्यांनी अमेरिकेच्या नागरिकांना राजधानीत गर्दी न करण्याचं आवाहन केले होते.

राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर आता जो बायडन यांना पगार आणि इतर सर्व भत्ते मिळणार आहे. न्यूयॉर्कमधील एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा वार्षिक पगार जवळपास चार लाख अमेरिकन डॉलर इतका आहे. जर भारतीय चलनात याचे मुल्य सांगायच झालं तर, जवळपास 2 कोटी 92 लाख रुपये इतके आहे. याव्यतिरिक्त राष्ट्राध्यक्ष म्हणून 50 हजार डॉलर्सचा वार्षिक भत्ताही मिळतो. तसेच एक लाख डॉलर्सचा नॉन टॅक्सेबल प्रवासी भत्ताही दिला जातो. अमेरिकेच्या राष्ट्रपतींना मनोरंजनासाठी वार्षिक 19 हजार डॉलर्स देण्यात येतात. जर एखाद्या राष्ट्रपतींना आपला पगार दान करायची असेल तर तीदेखील करता येते. राष्ट्रपतींची पत्नी म्हणजेच, अमेरिकेची फर्स्ट लेडीला कोणताच पगार दिला जात नाही.

दरम्यान, निवडणुकीत आपलाच विजय झाल्याचा दावा करणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर व्हाइट हाऊस सोडलं आहे. व्हाइट हाऊस सोडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना वॉशिंग्टन विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपल्या अखेरच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी कुटुंब आणि मित्रांचे आभार मानले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण कोणत्या ना कोणत्या तरी स्वरुपात पुन्हा परत येणार असल्याचं सूचक विधान केलं.