वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; १२ जणांचा मृत्यू, मृत भाविक 'या' राज्यांतील

वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; १२ जणांचा मृत्यू, मृत भाविक 'या' राज्यांतील

दिल्ली | Delhi

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) नववर्षादरम्यान एक धक्कादायक घडण घडली आहे. वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली आहे. जम्मूमधील कटरा इथल्या वैष्णो देवी मंदिर परिसरात ही चेंगराचेंगरी झाली.

या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सरु आहे.

मृत भाविक 'या' राज्यांतील

मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील लोकांचा समावेश आहे. मृतांमध्ये १ जण जम्मू-काश्मीरचा आहे. बाकीचे दिल्ली, हरियाणा, पंजाबचे रहिवासी आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

का झाली चेंगराचेंगरी?

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, गेट क्रमांक तीनवर काही तरुणांमध्ये वादावादी झाली आणि त्यानंतर काहींना धक्काबुक्की करण्यात आली आणि यादरम्यान लोक पळू लागले. या वादातून चेंगराचेंगरी होऊन १२ जणांचा मृत्यू झाला. तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मोदींकडून मदतीची घोषणा

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. 'माता वैष्णो देवी भवन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले. शोकग्रस्त कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, जखमी लवकर बरे होवोत. अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत दिली जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केली आहे. तर या घटनेतील सर्व जखमींना पंतप्रधान आपत्ती प्रतिसाद निधीतून (PMNRF) ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com