जम्मू-काश्मीरसाठी 1 हजार 350 कोटींचे पॅकेज

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केली घोषणा
जम्मू-काश्मीरसाठी 1 हजार 350 कोटींचे पॅकेज

श्रीनगर -

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या जम्मू-काश्मीरमधील उद्योगांसाठी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी तब्बल 1 हजार 350 कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची

घोषणा शनिवारी केली.

ते म्हणाले, आर्थिक संकटास सामोरं जात असलेल्या उद्योगांसाठी 1 हजार 350 कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करताना मला आनंद होत आहे. ही पॅकेज आत्मनिर्भर भारत आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या उपायांव्यतिरक्त असेल.

आम्ही चालू आर्थिक वर्षात कोणत्याही अटीशिवाय व्यावसायिक वर्गाशी निगडीत प्रत्येक कर्जदारास पाच टक्के व्याजात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा सहा महिन्यांसाठी असेल, यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळेल व राज्यात रोजगार निर्माण होण्यात मदत मिळेल.

याशिवाय वर्षभरासाठी वीज आणि पाणी पट्टीमध्ये 50 टक्के सूट दिली जाणार आहे. याचबरोबर सर्व उधार घेणार्‍या प्रकरणांमध्ये मार्च 2021 पर्यंत स्टॅम्प ड्यूटीतही सूट देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर बँकेद्वारे पर्यटन क्षेत्रातील लोकांना आर्थिक मदतीसाठी आरोग्य-पर्यटन योजनेची निर्मिती केली जाणार असल्याचेही सिन्हा म्हणाले.

क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गत हस्तकला उद्योगात काम करणार्‍या लोकांसाठी आर्थिक मदतीची मर्यादा एक लाखावरून दोन लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना सात टक्के व्याजात सवलत देखील दिली जाणार आहे. तसेच, 1 ऑक्टोबरपासून जम्मू व काश्मीर बँक तरूण आणि महिला उद्योजकांसाठी विशेष डेस्क देखील सुरू करणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com