जम्मू-कश्मीर : पुलवामात दहशतवाद्यांचा बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला

आठ जण गंभीर जखमी
जम्मू-कश्मीर : पुलवामात दहशतवाद्यांचा बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला

दिल्ली । Delhi

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील त्राल येथील बस स्थानकात दहशतवाद्यांनी बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात आठ नागरिक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका मंदिरावर ग्रेनेड हल्ला केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील पुलवामाच्या त्राल बसस्थानकावर हा हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत आठ जण जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपाचार सुरू आहेत. दहशतवाद्यांनी त्राल येथील बसस्थानकावरील एसएसबी जवानांवर हा ग्रेनेड हल्ला केला. मात्र, त्यांचा निशाणा चुकला आणि रस्त्यावरच ग्रेनेडचा स्फोट झाला. ज्यामध्ये आठ नागरिक जखमी झाले. हल्ल्यानंतर तातडीने संपूर्ण परिसर सील करण्यात आला व दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली, असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. तर, जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

दरम्यान, काश्मीर खोऱ्यात गेल्या तीन दिवसात हा तिसरा ग्रेनेड हल्ला आहे. गेल्या शुक्रवारी संध्याकाळी श्रीनगरच्या बायपास परिसरातील चनपोरा येथील एसएसबी कॅम्पजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नाही. अधिकाऱ्यांचा म्हणण्यानुसार दहशतवाद्यांनी एसएसबीच्या 14 बटालियन कॅम्पवरील ग्रेनेड कॅम्पवर हल्ला केला. ग्रेनेड हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाने त्या भागाची घेराव घेताना शोध मोहीम राबविली पण कोणताही हल्लेखोर सापडला नाही.

त्याआधी एक दिवस, शेवटच्या गुरुवारी जिल्हा अनंतनागच्या संगम भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 90 बटालियन गस्तीवर निशाणा साधत यूबीजीएल ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफ जवान जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे आता त्यांची प्रकृती अधिक चांगली सांगण्यात येत आहे. काश्मीर खोऱ्यातील अतिरेक्यांवर सुरक्षा दलांच्या कडक कारवायांमुळे तेथील दहशतवादी चवताळले आहेत. म्हणूनच त्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करुन त्यांच्यावरील हल्ले वाढले ​​आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com